भारतात आयात करण्यात आलेल्या गव्हापासून तयार केलेला आटा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. निर्यात आधारित युनिट व विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या कंपन्यांना ही परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे फूड प्रोसेसर देशातून मुल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने आयात करण्यात आलेल्या गव्हापासून बनवलेला आटा निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. तरीही मे महिन्याच्या सुरूवातीलाच भारतातून गव्हाची निर्यात तात्काळ प्रभावाने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात गव्हाच्या आटा निर्यातीवरही प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला.
देशाच्या पूर्वेकडील भागात पावसाच्या कमतरतेमुळे सरकारने गव्हासोबतच तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली. गहू आणि तांदूळ निर्यातीवर कडक कारवाईमुळे आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांवर अन्न संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता भारत सरकारने निर्यात आधारित युनिट व विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या कंपन्यांना आयात केलेल्या गव्हापासून बनवलेला आटा निर्यात करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे.