ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असून राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेत आहेत. अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशासह राज्यातील अनेक भागात शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी जवळपास गेल्या १० ते १५ वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं ड्रगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख ६० हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.
किती अनुदान मिळणार?
राज्य सरकारकडून एक हेक्टरवर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ४ लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम म्हणजे १ लाख ६० हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं ड्रॅगन फ्रुट लागवड योजनेसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी याबाबत सोडत देखील झाल्याचं ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
ड्रॅगन फ्रुटसाठी अनुदान किती टप्प्यात मिळणार?
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६० क्के म्हणजे ९६ हजार रुपये दिले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात २० टक्के अनुदान दिलं जाईल.
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान मिळवण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर ०.२० हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा असून त्यासाठी पासपोर्ट फोटो, सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, आधार कार्डसोबत जोडलेलं बँक खातं, जातीचा दाखला आणि इतर कागदपत्रं आवश्यक आहेत.