नवी दिल्ली – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर) इथेनॉलवर चालणारी पहिली कार देशात लॉन्च केली आहे. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते. या कार लॉन्चिंगकडे महागड्या पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
इथेनॉलवर चालणारी कार केवळ परवडणारी आणि स्वस्तच नसेल, तर तिच्या सहाय्याने पर्यावरणावर वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या वाईट परिणामांपासूनही संरक्षण होईल. ऊसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. उसाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. यामुळे देशात इथेनॉलचे उत्पादान मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते.
यामुळेच केंद्र सरकार इथेनॉल या पर्यायाकडे गांभीर्याने पाहत आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यावर आल्यानंतर इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. याच बरोबर, उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. भारतामध्ये टोयोटाने पायलट प्रोजेक्टअंतर्गत फ्लेक्सी-फ्यूल स्ट्रॉन्ग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (FFV-SHEV) म्हणून लॉन्च केली आहे.