केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत. एक कोटी रुपयांचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकत असेल पण असं काहीही नाही तुम्ही जे वाचलेय ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यात ऐकीकडं केळी पिकावर सी एम वी रोगानं थैमान घातले होतं. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. शेतकरी अडचणीत सापडला होते. अशातच या शेतकऱ्यांनं कोट्यवधींची कमाई केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ऐन दिवाळीचा काळात पाटील यांना हे उत्पन्न मिळाल्याने राजेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात राबणाऱ्या साल्दार,मजूर,सहकार्य करणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी शेतात कामा करणाऱ्या मजुरांचा आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार समारंभासह त्यांना कपडे, अन्न धान्य, मिठाई वाटप करून एक अनोख्या पद्धतीने ऋण व्यक्त करत दिवाळी साजरी केली आहे.
शेतीमध्ये आपल्याला एक कोटी हून अधिक रुपयांची कमाई होण्यामध्ये आपल्या शेतात अहोरात्र काम करणाऱ्या मजूर, साल्दार यांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदान मुळेच आपण आज एवढं उत्पन्न शेती मध्ये मिळवू शकलो. त्यामुळे त्यांचं ऋण व्यक्त केलेच पाहिजे अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दीड एकर शेती आहे. एकेकाळी शेतात मजुरी करत असल्याने राजेंद्र पाटील यांना शेतीच चांगलं ज्ञान अवगत झाले. मजुरी करीत असतानाच कृषी पदवी मिळवली. राजेंद्र पाटील हे नोकरीला ही लागले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाद निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा शेतीकडे वळले. आपल्याकडे जमीन कमी असल्याने त्यात पुरेसे उत्पन्न घेता येत नसल्याने पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडे तत्वावर घेत शेती करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना चांगलं यश मिळत गेल्याने आज पाटील यांच्याकडे पासष्ट एकर जमीन ही भाडेतत्वावर आहे. तर दीडशे जण त्यांच्या कडे काम करतात.
राजेंद्र पाटील हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी नेहमीच कृषीच्या नवीन तंत्राचा वापर आपल्या शेतीसाठी केला. जैन तंत्राने केळीची शेती केल्याने त्यांना उच्च दर्जाची निर्यातक्षम केळी ही निर्माण करण्याचं तंत्र अवगत झाले. त्यांच्या केळीला इतरांच्या पेक्षा जास्त मागणीही असते आणि शिवाय भावही जास्त मिळत असल्याने राजेंद्र पाटील यांना चांगलाच नफा यातून मिळाला आहे.
आपल्या शेतीमध्ये यश मिळण्यामागे शेतीमध्ये मेहनत सोबत नवीन तंत्राचा उपयोग करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शेतकऱ्यांनी आपल्या शेती व्यतिरिक्त अन्य गावच्या राजकारणात आणि भानगडीपासून दूर राहणे ही गरजेचे असल्याचं सांगताना आपण या सर्व पासून दूर राहून केवळ शेतीकडेच लक्ष दिल्याने हे यश आपल्याला मिळाल्याचे राजेंद्र पाटील सांगतात.
राजेंद्र पाटील हे शेतात आले तरी आणि नाही आलो तरी आम्ही त्यांच्या शेतीत प्रामाणिक पणांने काम केले आणि त्याचा फायदा शेती मध्ये पाटील याना चांगले उत्पन्न आले भावही मिळाला ,पाटील यांच्या आनंद मध्ये आमचाही आनंद आहे,त्यांनी आमचा मजुरांचा सत्कार केला त्याचा खूप आनंद झाला आमचा सत्कार आज पर्यंत कोणी केला नव्हता आणि केला ही नसता त्यांनी आमच्या चांगल्या कामाची दखल घेतली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे एका कामगाराने सांगितलं.