सांगली : ब्राझीलमध्ये उसाला ९ ते १६ हजार रुपये असा उच्चांकी प्रतिटन भाव दिला जातो. तसेच पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात ४ हजार तर इजिप्तमध्ये ३६००, थायलंड, मलेशियात ३२०० असा विक्रमी दर दिला जातो, अशी माहिती साखर कारखानदारातील तज्ज्ञ व शेती प्रश्नांचे अभ्यासक बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ब्राझीलमध्ये ऊस शेती व साखर उद्योगाला औद्योगिक स्वरूप दिले आहे. तेथे एकरी १५० ते २०० टन उत्पादन घेतले जाते. सरासरी रिकव्हरी १६ ते १८ टक्के असते. उसाची तब्बल पाच पिके तेथील शेतकरी घेतात. बहुतांश शेती ही कारखानदार कंत्राटी व यांत्रिकीकरण पध्दतीने करतात.
दररोज ५० ते ६० हजार टन उसाचे गाळप करणारे कारखाने तेथे आहेत. उसाला दर रिकव्हरीनुसार दिला जातो. टनाला साधारणपणे १८० किलो साखर मिळते. त्यातून ५० टक्के साखर व ५० इथेनॉल करतात.