दोन दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाई पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आली.
खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी 18 रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयातशुल्कात मोठी कपात केल्यानंतरही ही दरवाढ झाली आहे. तर सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे.
देशात सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीमुळे मागणी किमान 25 टक्क्यांनी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 किलो डब्यांच्या दरात 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी हे दर स्थिर होते. तर सूर्यफूल तेलाच्या 15 किलो डब्याच्या दरात 500 ते 700 रुपयांनी घट झाली होती. मात्र आता सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली.
गेल्या काही वर्षांपासून फराळाचे पदार्थ मिठाई विक्री दुकानातून खरेदी करण्याचा कल वाढला आहे. दिवाळीत खाद्यतेलांच्या मागणीत वाढ होते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या पुरवठा कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असल्याचे निरीक्षक गुजराथी यांनी नोंदविले.
घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली असून शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. पाम तेलाचे दरही वाढले आहेत. वनस्पती तुपाच्या दरात किलोमागे 50 रुपयांनी वाढ झाली आहे.