सांगली तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने ऊस शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी साठून राहिल्याने उत्पादन घटणार या चिंतेने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे.
या पावसाने आले, हळद, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासह अन्य भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पडणार्या पावसाने सध्या तोडणीला आलेल्या उसाचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे कडेगाव तालुक्यातील चित्र आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू झाला आहे. परंतु बहुतांश ठिकाणी उसाच्या शेतातून मोठ्या प्रमाणवर पाणी वाहत असल्याने ऊस तोडणी मजुरांना शेतातून ऊस बाहेर काढणे मोठे आव्हान ठरत आहे. पावसामुळे सध्या शेकडो एकरावरील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच हुमणी किडीने शेकडो एकरावरील उसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. पावसामुळे ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आर्थिक कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे बँकेची कर्जे कशी भागवायची या चिंतेने सध्या शेतकरी कासावीस झाला आहे. त्यामुळे शासनाने ऊस पिकांचेही पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सध्या ऊस उत्पादक शेतकर्यांतून जोर धरू लागली आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे