पेरू लागवड कशी करावी?
पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी 6 x 6 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.
उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे. कीड व रोगग्रस्त फांद्यांचादेखील बहर धरण्यापूर्वीच नायनाट करावा. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रतिएकरी पाच रक्षक सापळे लावावेत.
जमीन
पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन
जाती
सरदार (एल -४९)
अभिवृध्दीचा प्रकार
दाब कलम
लागवडीचे अंतर
६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.
खते
पूर्ण वाढ झालेल्या झाडास ४ ते ५ घमेली शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद व ३०० ग्रॅम पालाश, झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावीत पैकी निम्मा नत्र बहाराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारणेनंतर द्यावा तर स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहाराच्या वेळी द्यावा.
उत्पादन
७०० ते १५०० फळे प्रत्येक कलमी झाडापासून मिळतात.
कीड व रोग नियंत्रण
पिठ्या ढेकूण – पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसिलीयम लेकाणी (फुले बर्गासाईड) – ४० ग्रॅम १०० मि.ली. दुधात मिसळून १० लिटर पाण्यात फवारावे.
फळमाशी – फळमाशीचे नियंत्रणासाठी रक्षक सापळ्याचा वापर करावा.
मर रोग – मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१०० ग्रॅम/झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावे किंवा बोर्डो मिश्रण (१%) द्रावणाची मातीत जिरवणी करावी.
फळावरील डागांसाठी बाविस्टीन (०.१ %) + मॅन्कोझेब (०.२ %) ची फवारणी करावी.
इतर महत्त्वाचे
बागेत फांद्यांची दाटी झाल्यानंतर भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी २-४-५ टी ७० पीपीएम या संजीवकाची फवारणी करावी.