महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. आत्ता सध्या ज्वारी या धान्याचेही दर गगनाला भिडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना ज्वारीचे चांगले दर मिळत आहेत.
ज्वारीला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र दरवर्षी राज्यभरात ज्वारीला हजार ते पंधराशे रुपये क्विंटल दर मिळत असतो, मात्र यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2966 रुपयांचा दर मिळत असून, हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात बाजार समितीत दररोज पंधराशे ते दोन हजार क्विंटल ज्वारीची आवक होत आहे.
ज्वारीला दर चांगला मिळत असल्याने शेजारील जिल्ह्यातील आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती भागातील शेतकरी ज्वारी विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे