जनावरांमध्ये डेंगी हा आजार सर्वसामान्यपणे तीव किंवा तिवा या नावाने ओळखला जातो. या आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजारांसारखी असल्याकारणाने आजारी जनावरांवर लगेचच पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
साधारणपणे गाई, म्हशीमध्ये आढळणारा डेंगी (तिवा) हा आजार गायवर्गीय (बैल, गोऱ्हे इत्यादी) प्राण्यांत जास्त आढळतो. गायीपेक्षा बैलात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. अधिक दूध देणाऱ्या गाईंमध्ये तीवा जास्त आढळून येतो.
1) जनावरे आजाराची लक्षणे साधारणपणे तीन दिवस दाखवतात. त्यानंतर आपोआप बरी होतात.
2) तीन दिवस सतत ठणकून ताप आल्यामुळे शेतीकाम करणाऱ्या बैलाची कार्यक्षमता घटते.
3) दुभत्या जनावरांचे अचानक दूध उत्पादन (50-60 टक्के) घटते, तर काही जनावरांत कासदाह होतो. बऱ्याच वेळेस गाभण जनावरांचा गर्भपातही होतो.
4) अशक्त जनावरांपेक्षा सुदृढ जनावरांत हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो.
5) एक वर्षापेक्षा कमी वयाची वासरे या आजारास अत्यंत कमी बळी पडतात आणि आजारी पडलीच तर त्यांत आजाराची लक्षणे फारच सौम्य प्रकारची अशतात.
6) आजारामुळे बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी (1 टक्का) किंवा अगदी नगण्य आहे; पण बाधित जनावर जर एक आठवड्यापेक्षा अधिक काळ जमिनीवर पडून राहिल्यास अशा जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
कारणे
1) डेंगी हा विषाणूजन्य आजार असून, …..र्ह्याब्डो…. व्हायरस कुटुंबातील आरएनए गटातील ……ऐफिमिरो….. व्हायरस या विषाणूमुळे होतो.
प्रसार
1) कुलिकोइडस नावाची चिलटे हा आजार पसरवण्यास कारणीभूत ठरतात. चिलटांची वाढ होण्यास पूरक ठरणारे ऋतुमान उदा. पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा वातावरणातील अचानक होणारा बदल हा आजार होण्यास कारणीभूत ठरतो.
2) आजाराचा प्रसार वातावरण आणि चिलटांचा प्रादुर्भाव यावर अवलंबून असतो.
3) आजाराची बाधा एका गावातील जनावरास झाल्यास वाऱ्यामुळे चिलटे इतरत्र पसरतात आणि अचानक हा आजार इतर ठिकाणीही पसरतो.
लक्षणे
1) जनावरांना अचानक सडकून ताप येतो (105 ते 106 डिग्री).
2) जनावर ताठरते, काळवंडते, चारा-पाणी बंद करते, रवंथ बंद करते.
3) नाकातून, डोळ्यातून पाण्यासारखा स्राव येतो. अति प्रमाणात लाळ गाळते.
4) श्वासोच्छ्वाचा वेग वाढतो.
5) काही जनावरांत पोटफुगी, बद्धकोष्ठता होते. त्यानंतर हगवणही लागते.
6) आजारी जनावर लंगडते. विशेषतः मागच्या पायाने लंगडते. मागील पाय ताठरतात. जनावराची हालचाल मंदावते.
7) बाधित जनावरे जागेवरच सुस्त बसून राहते. काही जनावरे विशेषतः होल्स्टिन फ्रिजियन जातीची जनावरे जमिनीवर आडवी पडतात, हालचाल टाळतात.
8) काही जनावरांच्या पायावरील सांध्यावर सूज येते.
9) काही वेळेस जनावरांच्या पाठीवरील कातडीखाली हवा भरते. पाठीवर सूज येते.
कायमस्वरूपी पक्षाघाताची शक्यता
1) काही जनावरे आजाराची बाधा झाल्यानंतर खूप लवकर आणि पूर्णपणे बरी होतात, तर काही जनावरे चोवीस तासांत बरी होतात; पण बरीच जनावरे आजारपणाची लक्षणे आठवडाभर दाखवतात.
2) …….एफिफिमो…… व्हायरस जनावरांच्या चेतासंस्थेवर फार वाईट परिणाम केल्यामुळे किंवा बाधित जनावर जमिनीवर जोरात पडल्यामुळेसुद्धा काही जनावरांना कायमस्वरूपी पक्षाघात होऊ शकतो.
3) स्नायूंवर आलेली सूज चेता संस्थेवर दाब वाढवते, यामुळेही जनावरास पक्षाघात होऊ शकतो.
उपचार
1) आजारी जनावरांना ताप व वेदनाशामक औषधी द्यावीत.
2) पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, सलाईन, कॅल्शिअम आणि ब जीवनसत्त्वाची इंजेक्शन सुस्त पडलेल्या जनावरांत उपयोगी पडतात.
3) जमिनीवर बसून असलेल्या किंवा आडवे पडून असलेल्या किंवा पक्षाघात झालेल्या जनावरांना मालीश व इन्फ्रारेड थेरपी सुरू करणे उपयोगी ठरते.
4) डेंगी आजाराने बाधित जनावरे औषध उपचारास फार चांगला प्रतिसाद देतात. औषध उपचार सोबतच जनावरांची शुश्रूषा करणेही फार गरजेचे आहे. योग्य वेळी केलेले अचूक निदान चांगले औषध उपचार आणि काळजीपूर्वक केलेले चांगल्या शुश्रूषामुळे बाधित जनावरे दोन ते तीन दिवसांत पूर्णपणे बरी होतात. 5) अचानक दूध उत्पादन कमी झालेल्या व बसून पडलेल्या जनावरांच्या रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अशा जनावरांना कॅल्शिअमचे इंजेक्शन दिल्यास फार उपयोगी पडते आणि जनावरांचे दूध उत्पादनही पूर्ववत होते.
लसीकरण
लसीकरण करून या रोगाचा प्रतिंबध करता येतो; पण डेंगू प्रतिबंधक लस भारतात सध्यातरी उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात डेंगी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
1) कुलीकोइडस चिलटे हा रोग पसरविण्यास मुख्यपणे कारणीभूत असल्यामुळे चिलटांची वाढ होणारी जागा उदा. डबके, अस्वच्छ गोठे इत्यादी ठिकाणी नियमित कीडनाशकांची फवारणी करावी.
2) गोठा नेहमी कोरडा ठेवावा. जेणेकरून त्या ठिकाणी चिलटांचा प्रादुर्भाव होणार नाही.
3) गोठ्यात व गोठा परिसरात डबके किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
4) आजारी जनावरास ताबडतोब उपचार करून घ्यावेत.
जनावरातील डेंगी
1) आरएनए गटातील ……एफिमोरो…… व्हायरसमुळे होतो.
2) कुलीकोइडस नावाच्या चिलटामुळे जनावरात पसरतो.
3) असंसर्गजन्य आहे.
4) कमी वयाची उदा. तीन ते सहा महिने वयापर्यंतच्या वासरांना होत नाही. सहा महिने ते एक वर्ष वयाच्या वासरात कमी प्रमाणात व सौम्य तीव्रतेचा आढळतो.
5) दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या (गाय, बैल, गोऱ्हे इत्यादी) जनावरांत आजाराची तीव्रता जास्त असते. मादी जनावरापेक्षा नर (बैल, गोऱ्हे इत्यादी) जनावरांत जास्त प्रमाणात आढळतो.
6) सुदृढ प्रकृतीच्या जनावरात तसेच अधिक दूध देणाऱ्या गायी सुदृढ बैल आणि गोऱ्हात जास्त आढळतो.
7) मानवाचा डेंगी जनावरात होत नाही.