राज्यात दरवर्षी खरीप व लेट खरीप हंगामात चार-साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. पण, यंदा अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्रात तब्बल अडीच लाख हेक्टरची घट झाली आहे. रब्बीतील कांदा लागवडीची आता तयारी सुरु आहे. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात कांद्याचे भाव पाच हजारांवर जातील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील एकूण कांदा उत्पादनातील ७० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. त्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. परंतु, जुलै ते ऑक्टोबर या काळात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची रोपे वाया गेली आणि जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला नाही. त्यामुळे खरीप व लेट खरीपातील कांदा लागवडीत मोठी घट झाली. मागील वर्षी खरीप व लेट खरीपात तीन लाख ५९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. पण, यंदा केवळ एक लाख १९ हजार हेक्टरवरच कांद्याची लागवड झाली आहे. आता १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात कांदा लागवड वाढेल, असा अंदाज फलोत्पादन विभागाने व्यक्त केला आहे. मागच्या वर्षीचा जवळपास दोन-अडीच लाख टनापर्यंत कांदा शिल्लक असेल आणि बराच कांदा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने कांद्याचे भाव वधारतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, आता लागवड केलेला कांदा फेब्रुवारीत येईल. सध्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजारांपर्यंत आहेत.
कांदा लागवडीची सद्यस्थिती
खरीपातील लागवड : ९०,००० हेक्टर
लेट खरीपातील लागवड : २९,००० हेक्टर
रब्बीतील अंदाज : ४.५० लाख हेक्टर
सध्याचे प्रतिक्विंटल दर : २३०० ते २६००
‘साठेबाजी’वर वेळेतच नियंत्रण : कांदा लागवडीखालील क्षेत्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान आणि सध्याचा शिल्लक कांदा, या बाबींचा अंदाज घेऊन सध्याचा उपलब्ध कांदा काहीजण साठा करून ठेवतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कांद्याचे दर भरमसाठ वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर साठेबाजीवर लक्ष ठेवले जाईल असे फलोत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.