केळी हे एक नफा मिळवून देणारे पीक आहे. परंतु केळीच्या शेतीमध्ये थोडी जरी चूक झाली, तरी मोठे नुकसान होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाची रोपे लावण्याबरोबरच सावधगिरीच्या काही बाबी लक्षात ठेवूनच शेतकर्यांनी केळीची लागवड करायला हवी.
चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी तसेच चांगल्या प्रतीच्या केळीचे उत्पादन होण्यासाठी रोपांची निवड करण्यापासून फळांची छाटणी करेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची बारकाईने माहिती असणे गरजेचे आहे. तसेच तांत्रिक पैलूही शेतकर्यांना ज्ञात असायला हवेत.
केळीचे पीक हे अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे; परंतु अधिक नफा देणार्या पिकांमध्ये समस्याही अधिक असतात. पिकाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन केळीची शेती केल्यास लागवडीचा खर्च कमी होण्याबरोबरच फायदाही अधिक मिळतो. केळीच्या पिकासाठी जमीन अनुकूल करण्यापासूनच सुरक्षिततेची काळजी घेतलेली बरी. बिवेरिया बेसियान पाच किलोग्रॅम प्रती हेक्टर दराने 250 क्विंटल शेणाच्या कुजलेल्या खतात मिसळून जमिनीला द्यावे.
जर शेतात निमेटो कृमीची समस्या असेल, तर पेसिलोमाइसी म्हणजेच जैविक बुरशीची पाच किलोग्रॅम मात्रा कुजलेल्या शेणखतासोबत जमिनीला द्यावी. मुळावर गाठ निर्माण करणारे कृमी केळीच्या पिकासाठी सर्वाधिक धोकादायक ठरतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. तसेच रोपांना पोषणमूल्य पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. उभ्या पिकात कृमींचे नियंत्रण करण्यासाठी 250 ग्रॅम कडुलिंब किंवा 50 ग्रॅम कार्बोफ्युरानचा वापर रोपांच्या मुळाजवळ करावा. किडी आणि रोगांपासून बचावासाठी शेत अत्यंत स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. शत्रू कीटकांची संख्या कमी करण्यासाठी पिकात मध्येच एरंडाची रोपेही लावणे चांगले. तसेच मित्र जीवाणूंची संख्या वाढविण्यासाठी बांधावर सूर्यफूल, गेंद, कोथिंबीर अशा झाडांची लागवड करता येऊ शकते. पीक तयार होण्याच्या अवस्थेत शेतातील तण काढून खड्ड्यात गाडून टाकावे. तसेच पिकावर सातत्याने नजर ठेवावी. कीटकांची संख्या करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर करावा.
केळीचे पीक घेण्यासाठी संबंधित जमीन केळीची लागवड करण्यायोग्य आहे की नाही, याची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. केळीच्या पिकाला सुपीक जमीन लागते. मातीत योग्य प्रमाणात पोषक घटक असावे लागतात. यासाठी सर्वांत योग्य मार्ग म्हणजे मृदा परीक्षण. केळीच्या लागवडीसाठी जमिनीत पीएच स्तर 6 ते 7.5 यादरम्यान असायला हवा. अधिक आम्लयुक्त जमीन असल्यास केळीच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. शेतात पाणी साचून राहता कामा नये. म्हणजेच शेतातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. शेतात हवा खेळती राहावी, याचीही काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे रोपे एका रेषेत लावावीत. चांगल्या रोपांची निवड ही अत्यंत आवश्यक बाब आहे. टिशू कल्चरने तयार केलेल्या रोपांना 8 ते 9 महिन्यांत फुले येऊ लागतात आणि एका वर्षाच्या आत पीक तयार होते. त्यामुळे लवकर पीक येण्यासाठी, वेळ वाचविण्यासाठी आणि उत्पन्न लवकर सुरू व्हावे म्हणून टिशू कल्चरद्वारे तयार केलेली रोपे निवडावीत.
थोडे उष्ण आणि समजलवायू असलेले हवामान केळीच्या पिकासाठी उपयुक्त ठरते. केळीची शेती 13-14 अंशांपासून 40 अंशांपर्यंतचे तापमान सहज सहन करू शकते.परंतु
अधिक सूर्यप्रकाशाने केळीची रोपे कोमेजतात. चांगले पाऊसमान असलेले क्षेत्रही केळीच्या पिकासाठी उपयुक्त ठरते. केळीचे चांगले पीक हवे असल्यास शेतातील माती सुपीक असणे गरजेचे आहे. केळीची शेती करण्यापूर्वी संबंधित जमिनीत पीकचक्राचा अवलंब शेतकर्यांनी करावा.
चवळीसारखी पिके घेऊन त्यानंतर रोटावेटरने नांगरट केल्यास हिरवे खत जमिनीला मिळू शकेल. मातीत पोषक घटक नैसर्गिक स्वरूपात असतील, तर बाह्य घटकांचा वापर करावा लागणार नाही. केळीच्या लागवडीसाठी जून-जुलै हा कालावधी योग्य ठरतो. रोपे सुदृढ व्हावीत, यासाठी शेतकर्यांना आधीपासून दक्षता घ्यावी लागते. केळीच्या रोपांसाठी जूनमध्येच खड्डे खणून त्यात कंपोस्ट खत म्हणजेच कुजलेले शेणखत भरावे. मुळांवर पडणार्या रोगांपासून बचावासाठी कडुलिंबाचे खत खड्ड्यांमध्ये भरावे.
केळी हे दीर्घकालीन पीक आहे. त्यामुळे सिंचनाची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. ‘मोअर ड्रॉप पर क्रॉप’ हे तंत्र वापरणे अर्थात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे केळीच्या पिकासाठी चांगले. या प्रणालीसाठी सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे या प्रणालीचा अवलंब केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचतही होते. मजुरांचा खर्चही कमी येतो. ठिबक सिंचन प्रणाली केळीच्या शेतात बसविल्यास कीटकनाशकांचा शिडकावा करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. केळीची रोपे लावताना सूर्यप्रकाश आणि खेळती हवा, याचा विचार करून ती एका ओळीत लावणे आवश्यक असते. अनेक शेतकरी केळीच्या शेतात मल्चिंग तंत्राचा अवलंब करतात. असे केल्याने खुरपणीचा व्याप वाचतो. परंंतु जे शेतकरी थेट शेतातच रोपांची लागवड करतात, त्यांनी दर चार ते पाच महिन्यांनंतर खुरपणी करावी. तसेच रोपे तयार होईपर्यंत सातत्याने मुळावर माती टाकणे महत्त्वाचे आहे.
केळीच्या पिकासाठी मातीच्या सुपीकतेचा अंदाज घेऊन प्रती रोप 300 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम फॉस्फरस आणि 300 ग्रॅम पोटॅशची आवश्यकता असते. फॉस्फरसची अर्धी मात्रा रोपांची लागवड करतेवेळी तर उर्वरित मात्रा रोपण केल्यानंतर द्यावी. नत्राची पूर्ण मात्रा पाच भागांमध्ये विभागून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, फेब्रुवारी तसेच एप्रिल महिन्यात द्यावी. एका हेक्टरमध्ये केळीच्या सुमारे 3700 रोपांची लागवड करता येते. मुख्य रोपाच्या आसपास येणारी रोपे काढून टाकावीत.
पावसाळ्याच्या दिवसांत रोपांच्या आजूबाजूला माती टाकत राहावे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत केळीच्या पिकांवर विविध रोगांचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे या दोन महिन्यांत पिकाची विशेष काळजी घ्यावी. प्रती लिटर पाण्यात प्रोपोकॉनेझॉल औषध 1.5 मिली लिटर मिसळून रोपांवर फवारावे. केळीच्या शेतीमध्ये आमदनी चांगली असते आणि नफाही भरघोस मिळू शकतो. परंतु या पिकाची तितकीच काळजीही घ्यावी लागते. योग्य काळजी घेतली आणि पिकावर सातत्याने लक्ष ठेवले तर केळीसारखे हुकमी उत्पन्न मिळवून देणारे दुसरे पीक नाही