महाराष्ट्राच्या हवामानात सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात चिकूला मोठ्या प्रमाणावर बहर येतो आणि त्यापासून सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते एप्रिलदरम्यान फळे मिळतात. चिकूचा दुसरा बहर फेब्रुवारीमध्ये येतो व याची फळे मे-जूनमध्ये मिळतात. पहिला बहर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला येतो.
हवामानातील बदल यापुढे शेतीसाठी एकप्रकारे आव्हानच बनू पाहताहेत. वाढती महागाई, मजुरांची समस्या, खतांचा तुटवडा, बाजारपेठेतील चढ-उतार यांचा सामना करणे यापुढे शेतीसाठी क्रमप्राप्त झाले आहे. यावर उपाय म्हणून फक्त नफा या बाबीचा विचार न करता शाश्वत उत्पन्न व कमी खर्चात, कमी कष्टात शेतीसाठी आपण चिकू फळ पिकाच्या व्यापारी उत्पादनाची माहिती जाणून घेऊ.
चिकूसाठी हवामान व जमीन
सदाहरित वर्गातील चिकू पीक हवामान व जमिनीबाबत चोखंदळ नसून अतिथंड प्रदेश वगळता सर्वच ठिकाणी उत्पन्न देऊ शकते. उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ व उत्पन्न मिळते. जादा चुनखडीचे प्रमाण असणारी व पाणथळ जमीन वगळता सर्वच प्रकारच्या जमिनींमध्ये उत्पन्न चांगले मिळते.
महाराष्ट्रासाठी सुधारित जाती
1) काळी पत्ती – उत्तम जात, लांबट, अंडाकृती आकाराची फळे. अतिशय गोड व मृदू गर, झाडांची पाने गडद हिरवी व मोठी असतात. हिवाळा हा मुख्य काढणीचा हंगाम, महाराष्ट्रात 95 टक्के लागवड याच जातीची.
2) क्रिकेट बॉल – गोल व मोठ्या आकाराची फळे, पाने फिकट हिरव्या रंगाची, अतिपावसाळा असणार्या प्रदेशात जास्त उत्पन्न.
लागवड – चिकू लागवडीपूर्वी एप्रिल महिन्यात खड्डे खणून घ्यावेत व असे खड्डे मे महिनाभर उन्हात तापवून घ्यावेत. त्यानंतर त्यात शेणखत, माती यांचे योग्य मिश्रण भरून ठेवावे. यासाठी प्रत्येक खड्ड्यात 5 घमेली शेणखत, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल, 500 गॅण निंबोळी पेंड व उर्वरित सर्व माती भरावी. लागवडीसाठी 1×1×1 मीटर आकारमानाचे खड्डे खणावेत. प्रत्येक दोन खड्ड्यांमधील अंतर 10×10 मीटर राखावे. अशा प्रकारच्या लागवडीसाठी एकरी 40 खड्डे बसतात. मान्सूनच्या पहिल्या पावसानंतरच खड्ड्यांमध्ये कलमाच्या हुंड्या लावाव्यात. लागवडीनंतर कलमांना काठीचा आधार द्यावा.
खतांचे व्यवस्थापन
चांगल्या उत्पन्नासाठी व जोमदार वाढीसाठी चिकू झाडाला वर्षातून दोनदा खते द्यावीत. पावसापूर्वी जूनमध्ये आणि पावसानंतर सप्टेंबर महिन्यात खते द्यावीत. यासाठी पहिल्या वर्षी शेणखत 10 किलो. युरिया 300 ग्रॅम, एसएसपी 900 ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश 150 ग्रॅम द्यावे. यापैकी शेणखत जूनमध्ये संपूर्ण व इतर खते अर्धी असे द्यावे. उर्वरित अर्धी खते सप्टेंबरमध्ये द्यावीत. दरवर्षी खतांचे प्रमाण वाढत जाऊन पाचव्या वर्षापर्यंत शेणखत 50 किलो, युरिया 1.5 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 4-5 किलो व म्युरेट ऑफ पोटॅश 750 ग्रॅम याप्रमाणे द्यावे.कलमाचे वय 10 वर्षांनंतर 50 किलो शेणखत, 3 किलो युरिया व 9 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी फवारणी द्यावी. 2 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर झाडांना नियमित पाणी द्यावे. कलमाचा चार वषार्र्ंपर्यंत बहर धरू नये, पाणी झाडाच्या सान्निध्यात येऊ नये, यासाठी बुडाला माती लावावी व झाडाला रिंग करून पाणी द्यावे.
आंतरपिके व आंतरमशागत : चिकू झाडाची वाढ उशिरा होत असल्याने सुरुवातीची 8 -10 वर्षे बागेमध्ये विविध आंतरपिके घेता येतात. पपई, शेवगा, याखेरीज हंगामानुसार भाजीपाला उत्पन्न घेता येते. मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, हरभरा, भुईमूग यासारख्या द्विदल पिकांचा समावेश करून जमिनीचा पोत सुधारता येतो.
लागवडीनंतर कलमांची निगा घ्यावी. सुरुवातीच्या दिवसांत झाडाला दीड-दोन फुटांपर्यंत उपफांद्या येऊ देऊ नयेत. या उंचीपर्यंत फक्त खोड व नंतर 4-5 फांद्या सर्व दिशांना येतील, अशाप्रकारे वळण द्यावे. लागवडीनंतर 5 वर्षांनी बहर धरावा. त्याचप्रमाणे तणनियंत्रण करून पाणी देणे. यासारखी आंतरमशागतीची कामे करून घ्यावी. तण नियंत्रणासाठी खुरपणी किंवा तणनाशकांचा वापर करता येतो.
फळांचे बहार व्यवस्थापन : पाचव्या वर्षापासून चांगली वाढ झालेले झाड वर्षाला 2 ते 3 हजार फळे देऊ शकते. महाराष्ट्राच्या हवामानात सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात चिकूला मोठ्या प्रमाणावर बहार येतो आणि त्यापासून सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते एप्रिलदरम्यान फळे मिळतात. चिकूचा दुसरा बहार फेब्रुवारीमध्ये येतो व याची फळे मे-जूनमध्ये मिळतात. पहिला बहर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला येतो. परंतु, दुसरा बहर जादा तापमानाच्या भागात कमी येतो. बहर असताना पाण्याचा ताण पडल्यास व तापमान अचानक वाढल्यास उत्पन्न घटते. चिकू झाड त्याच्या वयाच्या 40 वर्षांपर्यंत फळे देते.