बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केलं असून ते २०० किमी प्रति तास वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलं आहे. त्यामुळे बांगलादेश-म्यानमारच्या सीमावर्ती भागात मुळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांनी किनारपट्टीजवळ जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या चक्रीवादळाचा बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागातील जिल्ह्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉक्स बाजार परिसरातून एक लाख ९० हजार लोकांना, तर चितगावमधून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रोहिंग्या नागरिक राहत असल्याची माहिती स्थानिक विभागीय आयुक्त अमिनुर रहमान यांनी दिली आहे.
बांग्लादेशप्रमाणे म्यानमारमधील राखीन भागातील १० हजार नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सुरु असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत येथील नागरिकांनी अन्न आणि इतर मदत दिली जात आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम ईशान्य-पूर्व भारतातील काही भागांवरही होण्याची शक्यता असून रविवारी (१४ मे) नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एनडीआरएफचे २०० बचावकर्ते कार्यरत असून १०० बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत.
मोचा चक्रीवादळ सिडू चक्रीवादळानंतरचं सर्वात मोठं चक्रीवादळ आहे. सिडू चक्रीवादळ हे नोव्हेंबर २००७ मध्ये बांगलादेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकले होते. या चक्रीवादळामुळे तीन हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.