आपल्या देशात अनेक शेतकरी हे शेळीपालन करतात. शेळीपालन व्यवस्थापनात सर्वांत जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते. शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही, त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे असते
यासाठी व्यवसायात असणारी जागरूकता महत्त्वाची असते. शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधे द्यावीत. त्यामुळे कळप जंतमुक्त राहू शकेल. पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी, गोचीड वाढीसाठी अनुकूल असते.
अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. अंगावर खाज सुटते, त्यामुळे शेळ्या बैचेन होतात, खाणे बंद करतात, हालचाल मंदावते यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे किंवा गोठा धुऊन घ्यावा.
खतांच्या किमतीवरून विधानसभेत राडा
शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही, त्या उष्णता सहन करू शकतात. गोठ्यातील आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी अथवा ६० वॉटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा. गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा ठेवावा गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसर पणा राहून पायाला फोड येतात, यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खाते अशक्त होतात.
पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना बाहेर सोडू नये. पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते. कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, जास्त प्रमाणात हा चारा खाल्यामुळे शेळ्यांना अपचन होते. पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात. पोटफुगी होऊ नये यासाठी गोडे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.
आंत्रविषार होऊ नये म्हणून लसीकरण करावे. फुफ्फुसदाह आजार गोठ्यातील चुकीच्या व्यवस्थापनामुळे होतो. नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते. लाळ्या खुरकूत आजाराचा प्रसार वेगाने होतो. यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यातच घटसर्प आणि फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे.
गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी, पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते, त्यामुळे चालताना घसरून पडणे हा प्रकार आढळतो त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते, जर योनी भाग व बाजूचा भाग स्वच्छ नसेल, तर गर्भाशयात जंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाचा वापर करून धुऊन काढावा. स्वच्छता ठेवावी.