अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे इतर फळपिकांसह सर्वसामान्यांचा गावरान मेवा म्हणून ओळख असलेल्या बांगरवाडीत सीताफळाच्या उत्पादनात यंदा घट झाली आहे. उत्पादन घटल्याने यंदा दरातही वाढ झाली आहे. परराज्यातून होणारी आवक निम्म्याने घटली असून फळांचा दर्जाही घसरला आहे. साधारणपणे विजयादशमीनंतर बाजारात सीताफळाची आवक सुरू होत असते. सध्या विविध ठिकाणी काही प्रमाणात सीताफळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
परंतु दर आवाक्यात नसल्याने सामान्य ग्राहकांना त्यांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. दिवाळीत बाजारपेठेत मोठी आवक असते. पण यंदा सीताफळांना फुले येण्याच्या काळात म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये राज्यात सर्वदूर अतिवृष्टी, संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना कळ्य़ा कमी आल्या आणि ज्या आल्या त्याही गळून पडल्या. फळाच्या वाढीच्या अवस्थेतही पाऊस होता.
झाडांची मुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे फळांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातच अनेक ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभावदेखील झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक दर मिळाला असला, तरीही उत्पादन कमी झाल्याने शेतकर्यांना फारसा फायदा मिळाला नाही. बाजारात साधारणपणे सीताफळाला शंभर ते 120 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.
थंडीचे दिवस सुरू झाल्याने बाजारात वाटाणा, शेवगा आणि गाजरही दाखल झाले असून, आवक कमी असल्याने दर प्रतिकिलो शंभरीपार गेलेले आहे. किरकोळ बाजारात वटाणा 120 ते 140 रुपये किलो आणि गाजर 80 ते 100 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.एकीकडे काही फळभाज्यांचे दर वाढलेले असतांनाच टोमॅटोचे दर प्रचंड घसरत आहे. सद्यस्थितीला बेल्हे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वीस रुपये किलोपर्यंत घसरले आहेत.
पावसामुळे घटलेली पालेभाज्यांची आवक आता सुरळीत होऊ लागली आहे. त्यामुळे दरातही निम्म्याहून जास्त घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपयांना असलेली मेथीची मोठी जुडी आता 30 ते 35 रुपयांवर आली आहे. तर 50 ते 60 रुपयांवर गेलेली शेपू-पालकाची मोठी जुडी आता 15 ते वीस रुपयांवर आली आहे. बाजारात कांदापातदेखील दाखल झाली असून, 40 ते 50 रुपयांना मोठी जुडी उपलब्ध आहे.