प्रत्येक जनावराची आहाराची गरज वेगळी असते. म्हणजेच कालवाडीसाठी, दुभत्या गायीसाठी, गाभण गायींसाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहार लागतो.
याशिवाय शारीरिक प्रक्रियेसाठी, शरीर वाढीसाठी, दूधनिर्मिती, प्रजनन, गर्भात वाढणाऱ्या वासरासाठी खाद्याची गरज ही वेगवेगळी असते.
गोळीपेंड म्हणजेच पेलेटेड फीड (palate Feed) द्वारे जनावरांना योग्य प्रमाणात संतुलित आहार (Nutritional Diet) पुरवता येतो. त्यामुळे लहान वासरे, गाभण गायी-म्हशींना गोळीपेंड देण्याची शिफारस केली जाते.
जनावरांना गोळीपेंड देण्याचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती पाहू.
दळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर स्वरूपात पॅकिंग करता येते. मात्र पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल, तर पॅलेट मिलची गरज असते. पॅलेट मिलमध्ये पशुखाद्यापासून गोळीपेंड तयार करता येते.
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानूसार गोळी पेंड तयार करताना फॉर्म्यूलेशन करावे लागते.
फॉर्म्यूलेशन करताना जनावरांची पशुखाद्याची गरज, कच्च्या मालाची गुणवत्ता, कच्च्या मालातील हानिकारक तत्त्वे, कच्च्या मालाची उपलब्धता आणि कच्च्या मालातील पौष्टिक तत्त्वे याही बाबी लक्षात घ्याव्यात.
गोळीपेंड बनविण्यासाठी पशुखाद्यात वापरला जाणारा कच्चा माल दळून किंवा भरडून घेतात. पॅलेट मिलमध्ये कंडीशनींग व पेलेटिंग मुळे तयार होणारी उष्णता स्टार्चचे विघटन करते त्यामुळे जनावरांना पचण्यासाठी योग्य असा आहार तयार होतो.
जनावरांना गोळी पेंड देण्याचे फायदे
उच्च तापमानामुळे हानिकारक सूक्ष्म जिवाणू नष्ट होतात त्यामुळे जनावरांना स्वच्छ व सकस खाद्य उपलब्ध होते.
पशुखाद्याची चव वाढते.
जनावरांच्या आरोग्यासाठी दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारे सर्व सूक्ष्म अन्नघटक यामध्ये समप्रमाणात मिसळलेले असतात.
उच्च तापमान व दाबाचा वापर केल्याने सर्व अन्नघटक एकत्र पेंडीच्या स्वरूपात असतात, त्यामुळे जनावरे खाताना त्याचे वर्गीकरण करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना पूर्णपणे मिश्रित खाद्य मिळते.
पुशखाद्य साठवणी साठी, हाताळणी साठी व वाहतुकीसाठी गोळीपेंड सोयीची ठरते.