मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, या काळात सर्व शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. तर, शेतामध्ये पेरणीसाठी आणलेल्या बियाणांच्या पाकिटामध्ये असलेले बुरशीनाशक बरेच शेतकरी शेतामध्ये, बांधावर उघड्यावर फेकून देतात. शेतामध्ये तणनाशक फवारणी करतात. तसेच फवारणीचे औषधीची डब्बे काही शेतामध्ये पाण्याजवळ फेकून देतात. त्यामुळे बरेच वेळेस पशुधनाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खालील उपाययोजना कराव्यात जेणे करुन पशुधनाची जिवित हानी टाळता येऊ शकेल.
काय करावे?
1) पशुधनाला वेळेवर आणि नियमित मान्सून पूर्व लसीकरण जसे की घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत करुन घ्यावे.
2) जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधी पाजावी जेणेकरुन त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होईल.
3) बाह्य परोपजीवी जसे गोचीड आणि गोमाशा यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा.
4) गोठ्यामध्ये करंज तेल, कापूर, निलगिरी तेल, कडूलिंब तेल साबनाचा फेस असलेल्या पाण्यात टाकून फवारणी केल्यास त्यांच्या वासाने बाह्य परोपजीवी जसे की गोमाशा, डास यांचा वावर कमी होवू शकतो.
5) जिल्हा आपती व्यवस्थापन, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त सुचनाचे पालन करुन हवामानाचा अंदाज अद्यावत ठेवावा. तसेच स्थानिक वर्तमानपत्र, रेडिओ, दूरचित्रवाणी यांच्याकडून सूचनाकडे लक्ष ठेवावे,
6) पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात नदीपात्राच्या जवळ असलेले जनावरे तेथे न बांधता अशा वेळी शक्यतो उंचावर तात्पुरत्या निवारामध्ये जिथे पाणी पातळी वाढली तरी गोठ्यात पाणी येणार नाही अशा ठिकाणी बांधावीत.
7) अतिवृष्टीचा इशारा असल्यास जनावरे विशेषत: नदीपात्राजवळ चरण्यास सोडू नये.
8) पशुखाद्य वैरणीची साठवणूक करुन ठेवावी, वैरण पावसाने भिजणार नाही अशा कोरड्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे. साठविलेल्या पशुखाद्यास अथवा वरणीस बुरशी लागणार लागणार नाही याची खात्री करावी.
9) गोठ्यातील विद्युत उपकरणे, कडबा कुट्टी है सुरक्षित असल्याची खात्री करावी. कुठेही विद्युत तारा खुल्या नसल्याची खबरदारी घ्यावी. गोठ्यामध्ये जनावरे दाटीवाटीने बांधू नये.
10) नदीपात्रा लगतच्या रस्त्यावर पाणी धोकादायक पातळीवर असेल तर अशा रस्त्यावर बैलगाडी, जनावरे यांची वाहतूक करणे टाळावे.
11) जनावरांना नैसर्गिकरित्या पाण्यात पोहता येवू शकत असल्याने पूर परिस्थिती वाटल्यास गोठ्यातील जनावरांना दावणीस बांधून ठेवू नये. त्यांना गोठ्यात खुले सोडावे.
12) चांगले व स्वछ पाणी पशुधनास पिण्यास द्यावे. त्यामुळे पशुधनास कोणतेही आजार होणार नाहीत.
13) मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याचा स्त्रोत सार्वजनिक ठिकाणापासून दूर आणि संरक्षित असावी आणि तेथे यासंबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा. याबाबतीत स्थानिक प्रशासनाच्या निदेशाचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी करावी.
14) डासाच्या नियंत्रणासाठी रोज संध्याकाळी कडू लिंबाच्या पानाचा धूर करावा जेणेकरुन डास पळून जातील . घरात व गोठ्यात डास येणार नाहीत. पशुधनाला पायातीत चिखल्या होऊ नये म्हणून यांना कोरड्या जागी बांधावे. साप, विंचू चावल्यास तात्काळ पशुवैद्यकामार्फत उपचार करुन घ्यावेत,
काय करु नये?
1) पेरणी झाल्यावर शेतामध्ये बियाण्याच्या पाकिटांमधील बुरशीनाशक थायरमची पुडी उघड्यावर फेकू नये.
2) तणनाशक फवारणी झालेल्या शेतात शेळ्या मेंढ्या पशुधन चरण्यास नेऊ नयेत. फवारणी औषधाचे रिकामे डब्बे पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवू नयेत.
3) पावसामध्ये ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांबांना, डीपीजवळ चरावयास बांधू नये. पावसाने भिजलेली वैरण पशुखाद्य जनावरास देऊ नये.
4) अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नदीपात्राजवळ जनावरे चरावयास सोडू नयेत. अतिवृष्टीच्या इशाराकडे दुर्लक्ष करु नये.
5) मूत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये, ज्वारीचे लहान लहान फुटवे खाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी पशुधनाला चरावयास सोडू नये. गोचीड प्रतिबंधात्मक फवारणीचे औषध पशुधनाच्या जवळ ठेवू नये.
6) हळदी मधील कोवळे नीळ फुली गवत पशुधनास खायला देवू नये, जनावरांना पायातील चिखल्या व निमोनिया होवू नये म्हणून ओल्या ठिकाणी किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी जनावरांना बांधू नये.
7) कोणत्याही पशुधनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग हिंगोलीच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुने यांनी केले आहे.