पुणे : पुरंदर तालुक्यात सध्या अंजीराचा खट्टा हंगाम जोरात सुरू आहे. दिवे परिसरात अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने थोडासा फटका बसला. मात्र, त्यातून आपल्या अंजीर बागा शेतकऱ्यांनी वाचविल्या.
या वर्षी सुरुवातीपासूनच अंजीराला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, याचा अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे अंजीर झाडावरच उकलत असून, उकललेले अंजीर अक्षरशः फेकून दिले जात आहेत. मागच्या आठवड्यात अंजीराच्या एका बॉक्सला तीनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळत होता. मालाचा दर्जा घसरल्याने बाजारभावही कमी झाले आहेत. अंजीर बागेसाठी उत्पादकांना साधारण एकरी एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो, शिवाय अंजीर तोडणी हे खूप कष्टाचे काम असते. बदलत्या हवामानाचा उत्पादकांना दरवर्षीच फटका बसत आहे. अंजीर नुकसानीची नोंद घेणारी यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे शासन दरबारी अंजीर उत्पादकांची उपेक्षा होत आहे.