राज्यात वादळामुळे काही ठिकाणी पाऊस पडला. आता राज्यात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता आकाश निरभ्र होत असून दिवसा उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आजपासून राज्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मागच्या २४ तासात राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात नागपूर येथे १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांताक्रूझ देशातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पूर्व-मध्य अरबी समुद्रातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन)किनाऱ्यापासून दूर निघून गेली असून, ही प्रणाली ओसरली आहे. दरम्यान, आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.
उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.