इंग्रजीमध्ये जिला स्त्रीच्या बोटांची उपमा दिली जाते ती नाजूक दिसणारी भेंडी प्रत्येकाच्या आहारात असते. भेंडीची भाजी न आवडणारा वर्ग कमी असेल. त्यामुळे या भाजीला कायम मागणी असते. परिणामी, भेंडीची लागवड शेेतकर्यांसाठी लाभदायक ठरते.
आपल्या देशातील हवामान या पिकाला पोषक असून निर्यातक्षम भेंडी उत्पादनास बराच वाव आहे. त्यासाठी योग्य जातीची निवड, सेंद्रिय खताचा वापर, रोग आणि किडींचे नियंत्रण, काढणी, हाताळणी आणि निर्यात सातत्य या बाबी महत्त्वाच्या आहेत.
निर्यातीसाठी प्रत्येक भाजीचे वेगवेगळे निकष ठरविलेले असतात. फळे कोवळी, गर्द हिरव्या रंगाची, दिसायला आकर्षक आणि लुसलुशीत असावीत. भेंडीचे फळ 7 ते 8 सें.मी. लांब आणि वजनाने 15 ग्रॅमपेक्षा कमी असावे. भेंडीची फळे सरळ आणि पाचधारी असावीत. फळांची टोके निमुळती, सरळ आणि टोकेरी असावीत. फळे ताजी, टवटवीत व देठासह काढलेली असावीत. फळांवर लव नसावी. फळे निरोगी असावीत. तसेच फळांमध्ये कीटकनाशकांचे आणि बुरशीनाशकाचे विषारी अवशेष नसावेत, असे विविध निकष त्यासाठी वापरले जातात.
अधिक उत्पादनासाठी आणि निर्यातीसाठी भेंडीच्या योग्य जातींची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. जातीची निवड करताना हळद्या (केवडा) रोगास प्रतिकार करण्याची क्षमता, अधिक उत्पादन आणि फळांना गर्द हिरवा रंग इत्यादी बाबींचा विचार करावा.
फुले उत्कर्ष ही जात 2003 मध्ये निवड पद्धतीने पुण्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातून प्रसारित करण्यात आली. या जातीची फळे हिरव्या रंगाची, पाचधारी, कोवळी आणि आकर्षक असून फळांची लांबी 8 ते 10 सें.मी. आहे. प्रथम फळांची तोडणी 48 ते 52 दिवसांत होते. या जातीपासून 230 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात केवडा रोगास कमी बळी पडते. अकोला बहार, वर्षा उपहार, पुसा सावनी, परभणी क्रांती, अर्का अनामिका अशा इतर जाती आहेत.
भेंडीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी कसदार, परंतु उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असणे चांगले असते. जमीन उभी आणि आडवी नांगरून घ्यावी आणि चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 टन टाकून ते कुळवाच्या सहाय्याने मातीत मिसळून घ्यावे. हे खत घालणे शक्य नसेल तर प्रथम खरिपात हेक्टरी 100 किलो ताग पेरून तो गाडून घ्यावा. एक ते दीड महिन्याने ताग कुजल्यावर त्यावर भेंडीचे पीक घ्यावे. भेंडीचे पीक किडी आणि रोगाला लवकर बळी पडणारे असल्याने जमिनीला भरपूर सेंद्रिय खते दिल्याशिवाय हे पीक निव्वळ रासायनिक खतावर घेण्याचे टाळावे.
महाराष्ट्रातील हवामान भेंडीच्या लागवडीस पोषक असल्याने भेंडीची लागवड तीन्हीही हंगामात करता येते. पावसाळी हंगामात भेंडीची लागवड जून-जुलै महिन्यात करावी. रब्बी हंगामात लागवड थंडी सुरू होण्यापूर्वी होईल, याची काळजी घ्यावी आणि उन्हाळी हंगामात लागवड 15 जानेवारी ते फेब—ुवारीअखेर या कालावधीमध्ये करावी.
भेंडी या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास निर्यातयोग्य भेंडी कमी मिळते. त्याकरिता कीड आणि रोगांचे वेळीच नियंत्रण करणे महत्त्वाचे असते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा आणि वनस्पतीजन्य औषधांचा वापर जास्त करावा. तसेच फळांमध्ये कीटकनाशकांचे अंश राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
अशी काळजी घेऊन करण्यात आलेले भेंडीच्या उत्पादनाला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते आणि तिला भावही चांगला मिळतो. त्यामुळे या पिकाची लागवड करताना शेतकर्यांनी या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आवश्यक वाटल्यास त्यासाठी शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेता येईल आणि त्याची माहिती देणारी पुस्तकेही उपलब्ध आहेत; पण या सार्यापेक्षा स्वःप्रयत्नांची आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींच्या अंमलबजावणीची गरज आहे. ते झाले तर भेंडीचे उत्पादन शेतकर्यांसाठी संजीवनीदायक ठरते.