सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी केले.
सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी (Custard apple production) उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टानी (Sham Gattani) यांनी केले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघ आयोजित नियमित मासिक चर्चासत्र व मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभाग, आत्मा, जालना, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, बदनापूर यांच्या सहकार्याने, सीताफळ महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रँडेड नल बालानगर एक दिवसीय सीताफळ कार्यशाळा शिवारफेरी, सीताफळ फळ प्रदर्शन, क्षेत्रिय किसान गोष्टी असा भरगच्च कार्यक्रम जाफराबाद तालुक्यातील मौजे नळविहिरा (जि.जालना) येथील पाटील कृषी फार्मवर रविवारी (ता.९) पार पडला. त्यावेळी श्री गट्टानी बोलत होते.
अध्यक्षस्थानी दमोतराव पाटील मोरे होते. सीताफळ महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एकनाथ आगे, कृषिभूषण भगवानराव काळे, कृषिभूषण सुदामराव सोळंके, कृषिभूषण बाळासाहेब कारखिले (अहमदनगर), ‘वृक्षाई’चे पृथ्वीराज तत्तापुरे (लातूर), कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे कार्यक्रम समन्वयक डॉ.श्रीकृष्ण सोनुने, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिनकुमार सोमवंशी आदी उपस्थिती होते.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंदकिशोर देशमुख, सुधीर जोशी, गणेश बुरकुल, सुरेश पाखरे, रामप्रसाद खैरे या शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले. ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्प अंतर्गत लागवड झालेल्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या सीताफळ फळांची प्रदर्शनी यावेळी भरविली होती.
या प्रदर्शनातून मान्यवरांनी सर्व अंगाने उत्कृष्ट सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची निवड केली. यात संजय दमोतराव मोरे (नळविहिरा) प्रथम, सुरेश प्रल्हाद पाखरे (टेंभुर्णी) द्वितीय तर संजय श्रीमंतराव देशमुख (दहिगाव) तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.
प्रथम पुरस्कार्थिंना श्री. बोराडे यांनी एक हजार एक, द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे श्यामजी गट्टाणी व एकनाथ आगे यांनी व्यक्तिगत पाचशे एक रुपयाचे बक्षीस दिले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन संदेश मोरे पाटील यांनी केले.