पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, पिंपरी, चिंचवडगाव व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये रविवारी कोथिंबीरची आवक वाढली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात 10 रुपयाला कोथिंबीरीची जुडी विक्रीसाठी उपलब्ध होती. मात्र, पालक, मेथी, शेपू आणि चवळीचे दर मागील आठवड्याप्रमाणेच 25 ते 30 रुपयाला जुडी असे होते.
कांद्याची आवक 231 क्विंटल आणि बटाट्याची आवक 607 क्विंटल एवढी झाली असून, मागील आठवड्यापेक्षा बटाट्याची आवक 132 क्विंटलने वाढली होती. मात्र, दर नेहमी प्रमाणेच स्थिर होते. घाउक बाजारात कांदा 13 ते 15 रूपये व बटाटा 18 ते 20 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध होता. टोमॅटोची आवक 418 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 10 रुपये किलो दराने विक्री झाली. भेंडीची आवक 50 क्विंटल ऐवढी झाली असून, घाऊक बाजारात 30 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. सोबतच काकडीची आवकही 93 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 10 रूपये प्रति किलोने विक्री झाली आहे.पालेभाज्यांच्या एकूण गड्डी 33650 तर फळे 390 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2170 क्विंटल एवढी आवक झाली आहे.
अर्कल मटार बाजारात आल्याने मटारचे दर आता कमी झाले आहेत. या मटारचे उत्पादन सासवड, जेजुरी भागामधून घेतले जाते. दोन आठवड्यापुर्वी 200 रूपये प्रतिकिलो विकला जाणारा वटाणा आता बाजारात 100 रूपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध होता. तर 250 प्रतिकिलो असलेला गोल्डन मटार रविवारी 130 रूपये दराने विक्रीसाठी होता. आठवडाभरात मटारचे दर सामान्याच्या आवाक्यात येतील,असे मत यावेळी विक्रेत्यांनी व्यक्त केले.