कांदा दरात आठ दिवसांत प्रतिक्विंटल सुमारे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाल्याने उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवाळीनंतर कांदा मार्केटमध्ये लिलाव सुरू झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणे दरात वाढ झाली. सरासरी कांद्याचे दर २८०० रुपये प्रतिक्विंटल, तर किमान १००० रुपये होते. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान १००१, कमाल ३२६०, तर सरासरी २५४० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तर शनिवारी (दि.१२) किमान ७००, कमाल २६५२, तर सरासरी १८५० रुपये दर मिळाला. शिवाय ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याची आवकही जास्त होती. त्या तुलनेत शनिवारी निम्मेच आवक होती. आवक कमी झाल्याने कांदा दरात वाढ होण्याऐवजी उलट ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल घसरले आहेत.
पिंपळगाव बाजार समितीमध्येही ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान १५००, कमाल ३६५०, तर सरासरी २६५० रुपये भाव होता. शनिवारी किमान १३००, कमाल ३०२०, तर सरासरी २१०० रुपये दर मिळाला.