शेतकरी बंधुंनो ताजी फळे व भाजीपाल्याचा आपल्या आहारात समावेश असतो. परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर जर या फळावर व भाजीपाल्याच्या पिकावर झाला असेल व विशेषतः या फळ व भाजीपाला पिकावर पीक काढणीच्या वेळी या रासायनिक कीडनाशकांचे अंश किड नाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादेच्या बाहेर (एम. आर. एल) शिल्लक राहिलेले असतील व अशी फळे व भाजीपाला आपल्या आहारात जर गेला तर तो मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो.
शेतकरी बंधुंनो सुरक्षित अन्नासाठी कीडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून पीक काढणी साठी चे प्रतीक्षा कालावधी काही कीटकनाशकसाठी शास्त्रज्ञांनी काढून दिलेले आहेत. या पीकवार कीडनाशकाच्या वापरानंतर कमाल अवशेष मर्यादा व पीक काढणीसाठी चे प्रतीक्षा कालावधी यांचा शेतकरी बंधूंनी गरजेनुसार संदर्भ घ्यावा व आपल्या आहारात जाणाऱ्या विविध फळे व भाजीपाला पिकात कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूंनो फळ व भाजीपाला पिकात कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील या दृष्टिकोनातून सर्वसाधारणपणे खालील काळज्या घ्याव्या.
(१) शेतकरी बंधूंनो कीडनाशकाचा वापर संबंधित पिकातील संबंधित किडीचे योग्य निदान करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच म्हणजे अधिकृत केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती यांच्या शिफारशीनुसारच व कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजी पूर्वक वाचूनच करावा.
(२) रासायनिक कीडनाशके फवारल्यानंतर संबंधित पिकातील शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यानंतरच त्यांची काढणी करावी.
(३) अनेक पिकात शास्त्रज्ञांनी संबंधित कीडी करिता रासायनिक कीडनाशकांची फवारणी करण्यापूर्वी पिकावर पाहिजे असलेली किडींची किमान संख्या म्हणजेच आर्थिक नुकसानीची पातळी शिफारशीत केलेली आहे तेव्हा शेतकरी बंधूंनी संबंधित पिकात संबंधित किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास योग्य निदान करून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या प्रमाणात संतुलितरित्या कीडनाशकांचा वापर करावा.
(४) शक्यतोवर रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा आणि पीक काढणीच्या काळात जैविक किंवा वनस्पतीजन्य कीडनाशकना प्राधान्य द्यावे. किडींचे व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीडनाशके यावर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अंगीकार करावा.
(५) फळे व भाजीपाला पिके काढणीयोग्य झाल्यावर काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकांच्या ऐवजी वनस्पतीजन्य व जैविक कीडनाशके यांचा वापर करणे फार योग्य परंतु रासायनिक कीडनाशके वापरायचे झाल्यास पीक काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी लक्षात घ्यावा व लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीडनाशके वापरावी.
(६) रासायनिक कीडनाशके वापरतांना ज्या कीडनाशकाच्या वापरावर बंदी आहे असली कीडनाशके वापरू नयेत तसेच मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली, कमी मात्रेमध्ये लागणारी, व अद्यावत लेबल क्लेम शिफारस असलेली परिणामकारक कीडनाशके योग्य प्रमाणात, योग्य वेळी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन वापरावी.
(७) फळे व भाजीपाला पिकात रसायनिक कीडनाशकाचा वापर करताना सतत एकाच कीडनाशकाचा वापर करणे टाळून त्या ऐवजी लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे आलटून पालटून कीडनाशकाचा ( वेगवेगळ्या कीडनाशकाचा) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा.
(८) ज्या शेतकरी बंधूंना आपली फळे व भाजीपाला निर्यात करायचा आहे त्यांनी शेतमालाची कीडनाशक अंश चाचणी करून संबंधित मालात कीडनाशकांचे अंश नसल्याची खात्री करावी व नंतरच संबंधित भाजीपाला अथवा फळे यांची निर्यात करावी.
(९) शेतकरी बंधूंनो आपले घरी फळे व भाजीपाला आणल्यानंतर साधारणता एक ते दोन टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्या द्रावणात फळे व भाजीपाला टाकून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते.
(१०) रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्यानंतर संबंधित पिकात संबंधित कीडनाशक फवारल्यानंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी साधारणपणे संबंधित कीडनाशकाच्या लेबलवर अथवा माहिती पत्रिकेवर दिलेला असतो तेव्हा संबंधित लेबल क्लेम शिफारशीचे व सूचनाचे काटेकोर पालन करावे.
(११) संबंधित पिकातील संबंधित कीडनाशकाचा पीक काढणीपूर्व प्रतिक्षा कालावधी हवामानानुसार उन्हाळा पावसाळा व हिवाळ्यात काही प्रमाणात कमी-अधिक होऊ शकतो.
शेतकरी बंधूंनो रासायनिक कीडनाशकांचे कमीत कमी अंश फळ व भाजीपाला पिकातून मानवी शरीरात जावे तसेच दर्जेदार मालाचे उत्पादन व निर्यात व्हावी या अनुषंगाने वर निर्देशित काही बाबी दिल्या असल्या तरी संबंधित विषयाचे तज्ञांशी गरजेनुसार प्रत्यक्ष सल्लामसलत करुन गरजेनुसार वापर करावा.