यंदाच्या गळीत हंगामासाठी घोडगंगा साखर कारखान्याचे साडेआठ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तसेच आ. अशोक पवार यांनी केले. न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते. कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक निवृत्ती गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मानसिंग पाचूंदकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, विश्वास कोहकडे, भानुदास फराटे, शंकर फराटे, कारखान्याचे संचालक तसेच ऊसतोड वाहतूक तोडणी कंत्राटदार, ऊस उत्पादक सभासद, शेतकरीवर्ग आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार पवार म्हणाले की, तत्कालीन शासनाने कारखान्याच्या कोजन प्रकल्पाबाबत चुकीच्या धोरणामुळेच कारखान्याला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. तरीदेखील कारखान्याने एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकर्यांना अदा केली. यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने पार पडला तर कारखान्याला निश्चित चांगले दिवस येतील. यंदाच्या हंगामासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेने जास्तीत जास्त बाजारभाव देणार आहे. निवडणूक आयोगाची मंजुरी आल्यावर सभासदांना नियमानुसार साखर मिळेल, असेदेखील पवार म्हणाले.
कारखान्याचे संस्थापक रावसाहेबदादा पवार व त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आ. पवार म्हणाले. कारखान्याला राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापक विद्याधर अनास्कर व अजित देशमुख यांचेदेखील आर्थिक बाबतीत वेळोवेळी मोठे योगदान असते, असे आ. पवार यांनी सांगितले.उपस्थितांचे स्वागत बाबासाहेब फराटे यांनी, सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी केले. तर आभार राजेंद्र गावडे यांनी मानले.