अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीचा निष्कर्ष
पुणे : ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर ‘लेवल’ नुसार केल्यास ते धोकादायक नसल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीने दिला. तथापि, भारताने पेस्ट कंट्रोल ऑपरेटरच्या (पीसीओ) माध्यमातूनच त्याच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. सरकारचा हा निर्णय हितकारक असल्याचे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त होताना दुसरीकडे त्याची उपयुक्तता व गरजही प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘पीसीओं’चा शेतीत वापर ही संकल्पना आजतरी अव्यावहारिक, अविकसित असून त्यांची पुरेशी उपलब्धता, अनुभव, कौशल्य आदींबाबतही प्रश्नचिन्हे उभी ठाकली आहेत. शेतकरी, मजूर, पदवी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून प्रमाणित परवानाधारक ‘पीसीओ’ यंत्रणा उभारणे शक्य असल्याचे मतही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
ग्लायफोसेट तणनाशकाचा वापर केवळ ‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर’ (पीसीओ) यांच्या मार्फतच करण्याविषयीचे निर्बंध केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच एका आदेशाद्वारे लागू केले आहेत. या तणनाशकाचा वापर देशातील शेतकरी विविध पिकांत अनेक वर्षांपासून करीत असल्याने या निर्णयामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होण्याबरोबरच अनेक शंकाही उपस्थित झाल्या.
अमेरिकेत एका व्यक्तीला ग्लायफोसेटमुळे कर्करोग झाल्याच्या कारणावरून मोन्सँटो कंपनीला जबर दंडही ठोठावण्यात आला.
ग्लायफोसेटच्या बाजूने व विरोधीही मतप्रवाह तयार झाल्याने गोंधळाचे वातावरणही तयार झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसह पर्यावरण आरोग्यासाठी हितकारक असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्याची उपयुक्तता व गरज लक्षात घेता त्यास सक्षम पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. राज्यातील ग्लायफोसेटच्या वापराचा विचार करता ‘पीसीओं’ची एवढ्या मोठ्या प्रमाणात व वेळेवर उपलब्धता, त्यांचा अनुभव, प्रशिक्षण, कुशलता या सर्व बाजूंवर प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. शेतकऱ्यांचा अनुभव व ज्ञान लक्षात घेता ‘पीसीओं’ची गरजच काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.