कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामात कांद्याने अक्षरशः रडवले होते. अवकाळी पाऊस आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कांदा अनुदान जाहीर केले होते. सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा खरेदीकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’ मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे.
उन्हाळी कांदा खरेदी लवकरच सुरू होणार
यावेळी झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ‘नाफेड’ मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पियुष गोयल यांनी दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे.
किंमत स्थिरीकरण निधी योजना
सध्याच्या स्थितीत कांद्याच्या किंमती पडल्या आहेत. ही स्थिती विचारात घेता, ‘नाफेड’ मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी अशी मागणी पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यात ग्राहक व्यवहार विभाग व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक (Buffer Stock of Onion) तयार केला जातो. यासाठी ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.
अशी होते खरेदी
या कांद्याची खरेदी शेतकरी उत्पादक कंपनी व महासंघामार्फत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर लिलावाद्वारे केली जाते. याशिवाय सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सुद्धा बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे खरेदी केली जाते.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
सध्याच्या चालू हंगामात राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी देखील केंद्रीय मंत्री गोयल यांच्या सोबत चर्चा झाली आहे. दरम्यान लवकरच ‘उन्हाळी कांदा खरेदी विक्री’ ची होणार आहे.