पी. सुब्बा राव हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील रेमाले या गावचे शेतकरी आहेत. भात, कापूस, मिरची आदी पिकांमध्ये त्यांचे कौशल्य आहे. तेल्यामाड या पिकात त्यांनी भुईमुगाचे आंतरपीक घेतले आहे. तेल्यामाड पिकात लागवडीच्या सुरवातीच्या पाच वर्षांच्या काळात आंतरपिकांमधून त्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे.
बागेला ठिबक सिंचन करून पाण्याची बचत साधली आहे.
तुषार सिंचन पद्धतीचा वापर
तेल्यामाड पिकाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने प्रति झाड 50 किलो व्हर्मिकंपोस्टचा वापर सहा महिन्यांच्या दोन हप्त्यांमध्ये केला आहे. जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात त्यांच्या तुलनेत सुब्बा राव यांना 20 टक्के उत्पादन अधिक मिळाले आहे. भुईमूग पिकासाठी त्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला होता. त्यांना या पिकापासून 30 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातून तेल्यामाडाच्या सुरवातीच्या काळातील देखभाल खर्च कमी करणे त्यांना शक्य झाले आहे.
आंतरपीक तेल्यामाड पिकात
या आंतरपीक पद्धतीमुळे मिरची, भाजीपाला पिके यांचे आंतरपीक तेल्यामाड पिकात घेण्यासाठी अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. भुईमूग पिकापासून उत्पादन तर मिळालेच शिवाय त्याच्या अवशेषांचा वापर व्हर्मिकंपोस्ट करण्यासाठी उपयोगात आणण्यात आला. पी. सुब्बा राव यांच्या प्रयोगशील व अभ्यासू वृत्तीमुळे आता कृष्णा जिल्ह्यात गाळाच्या सुपीक लाल मातीमध्ये सुमारे 3500 हेक्टर क्षेत्रामध्ये तेल्यामाडाची लागवड झाली आहे.
श्री. राव यांनी वयाची पासष्टी ओलांडली आहे, तरीही शेतीतील त्यांचा उत्साह कायम आहे. सुमारे साडेचार हेक्टर त्यांची शेती आहे. गेली 48 वर्षे त्यांनी आपली शेती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
भात, कापूस, मिरची, भुईमूग व तेल्यामाड अशी त्यांची पीक रचना आहे. त्यांच्याकडे 12 म्हशी, परसबागेतील कुक्कुटपालन, व्हऱ्मिकंपोस्ट युनिट अशी सुविधा आहे. कृष्णा जिल्हा तेल्यामाड उत्पादन कल्याण संघटनेचे ते अध्यक्ष आहेतच, शिवाय आंध्र प्रदेश व राष्ट्रीय तेल्यामाड शेतकरी संघटनेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे.