ट्रॅक्टरचे व्यवस्थापन हे कामाच्या तासावरून केले जाते. ट्रॅक्टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्स तपासून आवश्यकतेनुसार आवळून घ्यावेत. गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढविता येते, तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्य आहे.
1) दर 8 ते 10 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) इंजिनमधील (सम्पमधील) व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासावी.
ब) रेडिएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासावी.
क) जर ट्रॅक्टरचे काम धुळीमध्ये असेल तर एअर क्लिनरमधील तेल बदलावे.
ड) डिझेल लिकेज आहे का ते पाहावे.
2) दर 50 ते 60 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) फॅन बेल्टचा ताण योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.
ब) गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासावी.
क) ट्रॅक्टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी.
ड) बॅटरी व मोटर यांची सर्व कनेक्शन घट्ट बसवावीत.
इ) इंधन फिल्टर (डिझेल फिल्टर)मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.
3) दर 100 ते 120 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) इंजिन तेल बदलावे, तसेच बदलण्याजोगे फिल्टर्स बदलावेत.
ब) शक्यतो सर्वच्या सर्व ग्रीसिंग पॉइंटना वंगण द्यावे.
क) डायनामोच्या बेअरिंगमध्ये 8 ते 10 थेंब ऑइल टाकावे.
ड) पुढील चाकांमध्ये प्ले आहे का ते पाहावे व सर्व चाकांचे नट बोल्ट्स तपासून आवश्यकतेनुसार आवळून घ्यावेत.
इ) बॅटरी तपासून आवश्यकतेनुसार डिस्टिल्ड वॉटर घालावे.
4) दर 200 ते 250 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) ऑइल सम्प काढून स्वच्छ करून त्यात नवीन ऑइल भरावे.
ब) ऑइल फिल्टर तसेच डिझेल फिल्टर बदलावेत.
क) स्टिअरिंग कॉलमच्या बेअरिंग ग्रीसिंग कराव्यात.
ड) ब्रेक्सची तपासणी करावी.
5) दर 400 ते 500 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) पुढील चाकाचे हब ग्रीसिंग करावे.
ब) रेडिएटरमधील पाणी काढून तो स्वच्छ करून घ्यावा व पुन्हा नवीन पाणी भरावे.
क) क्लच तपासून घ्यावा.
ड) आवश्यकतेनुसार ब्रेक ऍडजस्ट करून घ्यावेत.
6) दर 750 ते 800 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) गिअर ऑइल बदलावे.
ब) ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे.
क) डिझेल टाकी साफ करावी.
ड) स्टिअरिंग बॉक्समधील ऑइल तपासून पाहावे.
7) दर 1000 ते 1200 तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी –
अ) पुढील व मागील चाकाच्या ऍक्सलचे बेअरिंग्ज स्वच्छ करून पुन्हा बसवावेत.
ब) बॉश पंप व नोझल्स अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून तपासून घ्यावेत.
क) व्हॉल्व्ह सेटिंग करून घ्यावेत.
ड) स्टार्टर डायनामो व कटआऊट तपासून घ्यावेत.
इ) बॉनेट, ग्रील मडगाईड तसेच सीट तपासून पाहावे व आवश्यकतेनुसार दुरुस्त करून घ्यावेत.
सुगीपश्चात ट्रॅक्टरची देखभाल
1) ट्रॅक्टर बाहेरून स्वच्छ पुसून घ्यावा व स्वच्छ करावा.
2) एअर क्लीनर स्वच्छ करावा व त्यामध्ये नव्याने तेल भरावे.
3) ट्रॅक्टर गरम होईपर्यंत इंजिन सुरू ठेवावे.
4) सर्व फिल्टर्स स्वच्छ करावेत.
5) क्रॅंककेसमधील सर्व वंगण तेल बाहेर काढावे व पुन्हा भरावे.
6) गिअर बॉक्स (ट्रान्समिशन) तेल पूर्णपणे बाहेर काढावे व निर्मात्यांच्या निर्देशानुसार पुन्हा नवीन तेल भरावे.
7) डिझेल टाकीमधील, फीड पंपामधील व डिझेल लाइनमधील सर्व डिझेल काढावे.
8) गंज प्रतिबंधक तेल प्रत्येक सिलिंडरमध्ये सोडावे.
9) ट्रॅक्टर बॅटरी सोडवून व्यवस्थित बाजूला ठेवावी.
10) चाकांना लावलेली वजने काढून चाकातील पाणी काढावे. ट्रॅक्टर लाकडी ठोकळ्याच्या साह्याने उचलून ठेवावा.
11) ट्रॅक्टरचा क्लच वेगळा करावा.
12) ट्रॅक्टरला कव्हर घालून झाकावा.