सध्याच्या वातावरणामध्ये करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या अवस्थेत अधिक असतो. या किडीची सुरुवात शेतातील बाजूच्या झाडांपासून होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजने आवश्यक आहे. या किडीची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.
मावा ही कीड अर्धगोलाकार, काळी आणि मृदू शरीराची असते. शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात. पूर्ण वाढलेल्या मावा किडीस दोन पंख असतात.
झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांदीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतो. अधिक प्रादुर्भावामध्ये झाडे वाळतात. परिणामी, झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अन्नरस शोषण करताना कीड साखरेसारखा चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते. चिकट पदार्थ फुलांवर पडल्यामुळे परागीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. परिणामी, दाणे कमी प्रमाणात भरतात. किडीने झाडाचा बराचसा भाग व्यापून टाकल्याने ती काळसर दिसतात. फुलोरावस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फुले व बोंडे कमी लागतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये झाडे फुले लागण्याआधीच वाळून जातात.
इतर माहीत : बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम; काय कराल उपाय, वाचा तज्ञांचा सल्ला
मावा किडीचं एकात्मिक नियंत्रण कसं करावं ?
शेताभोवती उगवलेली ग्लिरिसिडीया, गवत, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचांडा, हॉलीओक, चंदन बटवा इत्यादी वनस्पती या किडीसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यासाठी या वनस्पतींचा नाश करावा. पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत एक कोळपणी आणि एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. ढालकीटक म्हणजेच लेडीबर्ड भुंगेरे आणि क्रायसोपा दोन्ही मित्रकीटक माव्यावर उपजीविका करतात. त्यामुळे या मित्रकीटकांचे संरक्षण करावे.
रासायनिक नियंत्रण
आर्थिक नुकसानीची पातळी २७ मावा प्रति ५ सेंमी खोड अढळून आल्यास ॲझाडीरेक्टिन १० हजार पीपीएम २ ते ३ मिलि किंवा ॲसीफेट ७५ टक्के डब्ल्यूपी किंवा डायमिथोएट ३० टक्के ईसी १.३ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.