दुग्धव्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गोठा व्यवस्थापन यामध्ये मुक्तसंचार गोठा, आहार व्यवस्थापनात मुरघास, वंश सुधारणेसाठी लिंग निश्चित रेतमात्रा किंवा भृण प्रत्यारोपणाचा वापर वाढला आहे. असे तंत्रज्ञान वापरत असताना प्रत्येक वेळेस काही उणिवा राहण्याची शक्यता असते.
आपण देश विदेशातील तंत्रज्ञान वापरत असतो परंतु ते आहे तसे वापरण्यापेक्षा आपल्या भागात किंवा आपल्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून ते आपणास कसे लाभदायक होईल ते पाहिले पाहिजे.
आपल्या दुग्ध व्यवसायातील एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. यासाठी हा खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असावेत.
जनावराचे पोट हे चाऱ्यासाठी तयार झालेले आहे, त्यामुळे जनावरे अशा पौष्टिक चाऱ्याचा वापर चांगल्याप्रकारे करू शकतात. प्रयोगशील पशुपालक नेहमी एकदल चाऱ्यामध्ये मका, ओट, कडवळ तर द्विदल चाऱ्यामध्ये लुसर्न, बरसीम चाऱ्याचा जनावराच्या आहारात मुबलक प्रमाणात वापर करतात.
त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी असतो. हिरवा चारा जास्त दिवस सुरक्षित ठेवायचा असेल तर तो हवाबंद स्थितीत ठेवल्यास जास्त दिवस राहतो, याला मुरघास म्हणतात. Silage Making
दर्जेदार मुरघास निर्मिती करताना महत्त्वाचे मुद्दे :
चारा पीक, जातीची निवड :
-अधिक अन्नघटक मुरघासामार्फत जनावरांना मिळण्यासाठी योग्य चाऱ्याची निवड आवश्यक आहे.
-चारा पिकाच्या निवडी बरोबरच त्यामध्ये जास्त अन्नघटक पुरवठा करणाऱ्या जातींची निवड महत्त्वाची आहे.
– मका हे चारा पीक उत्तम असून त्यामध्ये आता बरेच नवनवीन देशी, विदेशी जाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये उत्पन्नाबरोबरच अधिक अन्नघटकसुद्धा मिळतात.
कापणी करताना योग्य वेळ :
-ज्यावेळेस सर्वाधिक अन्नघटक असतील, पचनियता चांगली असेल, त्याच बरोबर उत्पन्न जास्त असेल अशा वेळी कापणी करावी. प्रत्येक चाऱ्यामध्ये कापणीची विशिष्ट वेळ असते.
– मक्याचे कणीस मधोमध मोडले तर त्यामध्ये पांढरी दुधाची रेषा दिसते. अशा वेळेस मक्यामध्ये उत्पादनाबरोबर पचणारे आवश्यक अन्नघटकांचे प्रमाण सर्वाधिक असते.
चारा कुट्टीचा आकार :
– कुट्टीचा आकार हा मुरघास गुणवत्तेचा होण्यासाठी तसेच त्यातील अन्नघटक जनावरांना जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे आहे.
– कुट्टीचा आकार हा दीड ते दोन सेंटीमीटरच्या दरम्यान असावा. कुट्टी करताना मक्याचे दाणे फुटलेले असावेत. यामुळे मुरघास चांगला दाबला जातो, त्याची पचनियता वाढते.
बाह्य मिश्रण :
– मुरघास करताना सर्व नियम पाळत असू तर बाह्य मिश्रण टाकण्याची गरज नाही. परंतु बऱ्याच वेळेस काहीवेळा पाण्याचे प्रमाण थोडे जास्त आहे, कापणी उशिरा झाली असेल तर अशावेळेस किण्वन प्रक्रियेला मदत करण्यासाठी काही उपयुक्त जिवाणूंची मदत घेऊन मुरघास अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न करावेत.
– अन्नघटक वाढविणारी, किण्वन प्रक्रियेला मदत करणारी बाह्य मिश्रणे आहेत. परंतु मीठ व युरिया यांचा वापर टाळावा.
मुरघास दाबण्याची प्रक्रिया :
– मुरघास अधिक गुणवत्तेचा करण्यासाठी त्यामधील जास्तीत जास्त हवा काढून टाकावी. नंतर अशी हवाबंद स्थिती नियंत्रित ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
– यासाठी कुट्टीचा आकार, पाण्याचे प्रमाण, हवा बाहेर काढण्यासाठी वापरली जाणारी पद्धत फार महत्त्वाची आहे.
आंबवण प्रक्रिया :
– मुरघासाची गुणवत्ता पूर्णत : किण्वन किंवा आंबवण प्रक्रिया किती प्रभावीपणे होते यावर अवलंबून आहे. यासाठी बरेच घटक जबाबदार असतात. त्याची परिपूर्णता केल्यास ही प्रक्रिया चांगली होते.
– मुरघासाचा सामू ४.२ ते ४.५ च्या दरम्यान असावा.
हवाबंद ठेवण्याची पद्धत :
– मुरघास करताना तो हवाबंद स्थितीत राहणे हे गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
– चाऱ्यावर जास्तीत जास्त दाब देऊन शक्य तेवढी हवा बाहेर काढावी. त्यात पुन्हा हवा जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
अन्नघटकांचे नुकसान :
– मुरघास करताना चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे शिफारशीपेक्षा जास्त असेल तर तळाशी पाणी जमा होते. यातून काही अन्नघटक बाहेर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण कायम ६५ ते ७० टक्के राहील याची दक्षता घ्यावी. Silage Making
शुष्क घटकांचे प्रमाण :
– मुरघास अधिक गुणवत्तेचा होण्यासाठी त्यामध्ये शुष्क घटक व पाणी यांचे प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे शुष्क घटकांचे प्रमाण मुरघास करतेवेळी ३० ते ३५ टक्के आणि पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्यांच्या दरम्यान असावे.
– पाण्याचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा मुरघासाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. जास्त झालेले पाणी वाहून गेल्याने त्यामधून अन्नघटक वाया जाण्याची शक्यता असते.
पाण्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असल्यास सुद्धा किण्वन प्रक्रिया योग्य प्रकारे न झाल्याने मुरघासाची गुणवत्ता अपेक्षेप्रमाणे मिळत नाही.
मुरघासाचा रंग, वास :
– फिक्कट तपकिरी ते पिवळा रंग, योग्य आम्लता, पिकलेल्या कवठाच्या फळासारखा वास असणारा मुरघास चांगला असतो. या पेक्षा वेगळा रंग किंवा वास असेल तर त्याची गुणवत्ता कमी असेल असे समजावे.