या वर्षी आतापर्यंतचा भारतातील सर्वाधिक तापमान असणारा दिवस ६ मार्च हा होता. ३९.३ अंश सेल्सिअस म्हणजेच सर्वसाधारण तापमानाच्या सहा अंश सेल्सिअसने जास्त होता. हा तापमानातील बदल जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे.
वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेले वायूंचे मिश्रण, बाष्प आणि धूलिकण यांचे आवरण. यात होणारे बदल हे हवामान बदलास पर्यायाने जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरतात.
हवामान बदल म्हणजे एखाद्या प्रदेशात हवामानाच्या पद्धतीमध्ये दीर्घकालीन होणारे बदल. याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागले आहेत.
उष्माघात
१) उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो. उष्णतेमुळे जनावरे थकतात, त्यांची भूक मंदावते.
२) म्हशींमध्ये गाईंच्या तुलनेत घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो. मात्र, सूर्यकिरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांचा विचार करता इतर जनावरांच्या तुलनेत म्हशींमध्ये याचा त्रास कमी असतो, कारण म्हशीच्या कातडीत मॅलेनीनचे प्रमाण अधिक असते.
लक्षणे
१) तहान आणि भूक मंदावून ती अस्वस्थ होतात.जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, धाप लागते. श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो.
२) डोळे लालसर होऊन डोळ्यांमधून पाणी गळते. लघवीचे प्रमाणही कमी होते.लाळ गाळणे, नाकातून स्राव येतो.जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करतात.
३) आम्लपित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकतो. पचनक्रिया बाधित होते.
४) गर्भपात, अकाली प्रसूती होते. जनावरे एकाच जागी दिवसभर बसून राहतात. चालताना अडखळतात.
उपाययोजना
गोठ्याचे व्यवस्थापन:
१) गोठ्याचे छप्पर सिमेंट पत्र्याचे असावे. त्यावर वाळलेले गवत, कडब्याची मोळी किंवा उसाचे पाचट टाकावे , त्यामुळे छत गरम होत नाही. पत्रा असल्यास त्याच्या वरील बाजूस चुना लावावा, आतील बाजूस हिरवा रंग लावावा. संकरित गाईंना रोज थंड पाण्याने अंघोळ घालावी.
२) गोठ्यातील छताची उंची जास्त असावी. यामुळे बाहेरून येणारी गरम हवा बाहेर टाकली जाईल.
३) दुपारच्या वेळी गोठ्यातील तापमान कमी ठेवण्यासाठी स्प्रिंकलर आणि फॉगरचा दर तासाला ३ ते ४ मिनिटांसाठी वापर करावा.
४) गोठा कोरडा राहील यासाठी फॅनचा वापर करावा. दिवसातून दोन ते तीन वेळा जनावरांना थंड पाण्याने धुवावे.
५) थेट सूर्यप्रकाशापासून बचावाकरिता जनावरांना झाडाखाली किंवा सावलीमध्ये बांधावे.
६) गोठ्याच्या बाजूने गोणपाट किंवा पोती पाण्याने भिजवून बांधावीत.
७) दुधाळ जनावरे विशिष्ट अंतरावर बांधावीत. जेणेकरून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेमुळे जनावरांवर ताण पडणार नाही. गोठ्यातील तापमान नियंत्रित राहील.
८) दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर ओले केलेले कापड किंवा पोती टाकावीत. दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे टाळावे.
९) गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत.
आहार व्यवस्थापन
१) आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा. जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून तापमान योग्य ठेवण्यास मदत होईल.
२) जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी पाण्यामध्ये बर्फाचा वापर करावा. जनावरांना ग्लुकोज पावडर व गूळ मिश्रित पाणी द्यावे. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे किंवा पाणी देण्याच्या वेळा वाढवाव्यात.
३) दुपारच्या वेळी किंवा भर उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये. वाळलेला चारा आणि खुराक शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. दुपारच्या वेळी हिरवा चारा द्यावा.
४) जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादन, गर्भ वाढ आणि शरीरक्रियेसाठी करतात. बाहेरील वातावरणातील उष्णता वाढल्यास जनावरांवर ताण येतो. परिणामी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची अतिरिक्त ऊर्जा खर्च होते.
पशुउत्पादनावर परिणाम
१) उष्माघाताच्या वेळी जनावरे स्वतःची चयापचय क्रिया कमी करून, ऊर्जा निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते त्यांचा आहार कमी करतात. यामुळे वाढत्या जनावरातील वजन वाढ कमी होते. पर्यायाने सर्वसाधारण वाढ ही सरासरीपेक्षाही कमी होते. यामुळे जनावरे उशिरा वयात येतात.
२) जनावरांच्या उन्हाळ्यातील कमी खाण्याने दूध निर्मिती घटते. जास्त दूध देणारी जनावरे जसे की संकरित गाईंवर याचा प्रभाव, कमी दूध उत्पादन करणाऱ्या देशी गाई पेक्षा जास्त प्रमाणात होतो.
३) तापमान निगडित दुधातील घट, पाळीव प्राण्यात जसे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या इत्यादींमध्ये दिसून येते. शारीरिक तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास एक लिटर पर्यंत दुधात घट होऊ शकते. दुधाची प्रत घसरते. दुधातील फॅट, एस एन एफ , साखर , प्रथिने इत्यादीची पातळी खालावते.
४) मांसाची प्रत जास्त तापमानामुळे, थंड हवामानापेक्षा जास्त बाधित होते. कमी खाणे, वाढ कमी होणे, त्यामुळे अशी जनावरे आजारांना लवकर बळी पडतात आणि जनावरांमधील मरतूक वाढते.
५) मेंढीतील लोकर उत्पादन कमी होऊन मेंढपाळांना आर्थिक नुकसान होते. वराहामध्ये उत्पादन घटते.
वातावरण बदलाचा प्रजोत्पादनावर परिणाम
१) उन्हाळ्यात नरांमध्ये थायरॉईड या अंतस्त्रावी ग्रंथीचा स्त्राव कमी प्रमाणात स्त्रवला गेल्याने वीर्याची प्रत निकृष्ट बनते. मादी जनावरांमध्ये तात्पुरते वंध्यत्व वाढते.
२) मुका माज किंवा माज न येणे यामुळे प्रति जनावर कृत्रिम रेतनाची संख्या वाढते. भाकड काळ वाढतो. दुधाचे दिवस कमी होतात.
३) पुष्कळ वेळा जनावरे मुदतपूर्व वितात. जनावरे उशिरा माजावर येतात. मादीमधील अंडे फलित होण्याचे प्रमाण घटते. सहसा ही घट वराह, मेंढ्या यामध्ये जास्त प्रमाणात असते.
३) गाई, म्हशी गाभण राहण्याचे प्रमाण घटते. जनावर गाभडण्याचे प्रमाण देखील वाढते. शुक्रजंतूंची विर्यातील संख्या कमी झाली असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
पुनरुत्पादनातील परिणाम
१) शुक्रजंतूची हालचाल मंदावणे, मृत शुक्रजंतूची संख्या वाढ.शुक्रजंतूमध्ये विकृती.
२) विर्यातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते, टेस्टोस्टिरोन संप्रेरकांचे प्रमाण घटते.
३) मादी पुनरुत्पादनावर परिणाम, माजाचा कालावधी कमी होते.
४) इस्ट्रेडियोल संप्रेरकांचे माजाच्या कालावधीत प्रमाण कमी होते.कॉर्टीसोलचे प्रमाण वाढते.
५) गाभण राहण्याचे प्रमाण घटते, तात्पुरते वंध्यत्व.भृणावर होणारा परिणाम.
६) भ्रूण वाढ प्रमाणात होत नाही, भ्रूण वाढ खुंटते.
७) गर्भाशाच्या वारास कमी रक्त पुरवठा.खुजी,पूर्ण वाढ न झालेली वासरे तयार होतात.
म्हणजेच त्यास कमी प्राणवायू, पाणी, अन्नद्रव्ये आणि संप्रेरकांचा कमी पुरवठा
८) कृत्रिम रेतनानंतरच्या ८ ते १६ दिवसात उष्णतेचा ताण झाला, तर बीजांड फलित होत नाही.
शरीर स्वास्थ्यावर होणारा परिणाम
१) गरज आहे त्यापेक्षा कमी ऊर्जा खाद्यातून मिळते, याचा जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. जी ऊर्जा एरवी जनावराने स्वतःच्या वाढीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्पादनासाठी वापरली असती, ती ऊर्जा त्या जनावरास स्वतःचे तापमान नियमित करण्यात घालवावी लागते. यातून शारीरिक प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे कास दाह, गर्भाशय दाह, मायको टॉक्सिकॉसिस वाढतो.
२) तापमानवाढीचा परिणाम वाहकामार्फत होणाऱ्या आजारांच्या प्रसारात होतो. निल जिव्हा, गोचीड ताप, क्यू फिवर, डेंग्यू इत्यादी. एरवी न पाहिलेले आजार जनावरात आपल्या भागात आढळून येण्यास सुरवात होते.