ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असुन मराठवाड्यात या पिकासाठी पोषक हवामान आहे. ज्वारी हे चारा वर्गीय पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्याची शेती आहे तेथे अधिक पेरा केला जातो. या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे अमेरिकन लष्करी अळी (spodoptera frugiperda) हे शास्त्रीय नाव असून Noctuidae या कुळातील आहे लष्करी अळी हि एक बहुभक्षी किड असुन ३५० पेक्षा अधिक पिकावर आपला जीवनक्रम पूर्ण करते. तिला पडकी अळी असेही संबोधतात.
जीवनक्रम
अमेरिकन लष्करी अळी च्या प्रामुख्याने जीवनाच्या अंडी, अळी, कोष, आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था खूप नुकसानकारक असते मादी पतंग साधारणपणे १००० ते १५०० हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर, पोंग्यामध्ये घातली जातात. त्याला लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण असते. अंड्याचा रंग १२ तासानंतर गडद तपकिरी होतो. तर २-३ दिवसात अंड्यांतून अळी बाहेर पडते. अळीच्या सहा अवस्था असतात त्यानुसार रंग बदलतो लहान अळीचा रंग हा हिरवा असतो तर डोके हे काळया रंगाचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये तपकिरी रंग असतो तर शेवटच्या अवस्थे मध्ये अळीच्या अंगावर गडद ठिपके दिसून येतात तसेच डोळ्याचा वरी Y आकार स्पष्ट दिसून येतो. त्यांनंतर पिकाच्या जवळ जमिनीत तिचा कोष अवस्थेचा काळ हा एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असू शकतो. अश्या प्रकारे तीच्या १० ते १२ पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात.
नुकसानीचा प्रकार
रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीसाठी पोषक आहेत. लहान अळ्या पानाचा हिरवा भाग खरडून खातात त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात व मोठी अळी ही पोंग्यमधील पाने खाते व पानांना छिद्र पडतात. अळी ने पोंगा खाल्ल्याने वाढ खुंटते परिणामी उत्पादन कमी होते पोटरा अवस्थेतील ज्वारी देखील खाऊ शकते. पोंग्यावर लाकडाच्या भुश्या सारखी अळीची विष्टा हे तिच्या प्रादुर्भावाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१. उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे कोष अवस्थेतील किडी प्रखर सूर्यप्रकाश मुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होतात.
२. आंतरपीक म्हणून ज्वारी + मूग + उडीद या पद्धतीचा वापर करावा.
३. ज्वारीच्या बाजूने मका पिकाची लागवड सापळा पिकं म्हणुन करावी.
४. आंतर मशागत करून तण काढून टाकावी.
५. शक्य असल्यास अंडीपुज गोळा करून नष्ट करावी.
६. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्या मध्ये वाळू मिश्रित राख टाकावी त्यामुळे प्रादुर्भाव कमी होतो.
७. मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
८. शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
९.पीक पोंगा अवस्थेत असताना अझाडीरिक्टिन ५.०० डब्लू, एस. पी ची फवारणी करावी.
१०. लष्करी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी नोमुरिया रिले या जैविक कीटकनाशकाची ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
११) किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी( २ ते ३ पतंग पतंग प्रति एक कामगंध सापळे)ओलांडल्यानंतर खालील पैकी कोणत्याही एका रासायनीक कीटकनाशकाची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून नपसॅक पंपाने करावी. व पॉवर पंपाने करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी * अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ०.५% एस .जी ४.४ ग्रॅम किँवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी प्रति ३ मिली किँवा थिओडीकार्ब ७५% डब्लू. पी १६.६६ मिली किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल (९.३ टक्के) + लॅम्बडा सायहेलोथ्रीन (४.६ टक्के झेड सी) संयुक्त कीटकनाशकाची ५ मि.लि
( सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)
लेखक : प्रा. अमोल ढोरमारे ( सहायक प्राध्यापक कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी (तांडा) उदगीर) मो. न ९६०४८३३८१५