शेतकरी बंधूंनो कांदा पिकावर प्रामुख्याने तीन प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
(१) जांभळा करपा किंवा अल्टरनेरिया करपा : प्रामुख्याने हा करपा कांदा पिकावर खरीप हंगामात अल्टरनेरिया पोरी या बुरशी मुळे होतो. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यावर सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. याप्रकारच्या करपा रोगात कांदा पिकावर पानावर सुरवातीस खोलगट लांब पांढरे चट्टे पडतात. या पट्ट्याचा मधला भाग सुरुवातीला जांभळट लालसर व नंतर काळपट होतो. अनेक चट्टे पानावर पडून आणि एकमेकात मिसळून पाने करपतात व वाळतात. खरीप हंगामातील दमट ढगाळ व पावसाळी वातावरण या रोगास पोषक असते.
(२) काळा करपा : या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खरीप हंगामातील कांदा पिकावर Colletotrichum नावाच्या बुरशीमुळे होतो नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगात सुरुवातीला कांद्याच्या पानावर गोलाकार राखाडी ते काळे रंगाचे ठिपके दिसतात. काळे रंगाच्या ठिपक्याचा मधला भाग पांढरा रंगाचा असून त्या भोवती गोलाकार काळे ठिपके असल्याचे दिसते. ठिपक्याची प्रमाण वाढल्यामुळे पाने आखडतात, खाली वळतात आणि वेडीवाकडी होऊन शेवटी वाळतात. पाण्याचा निचरा न होणे ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पाऊस यामुळे या रोगाचे प्रमाण वाढते.
(३) कांदा पिकावरील तपकिरी करपा : कांदा पिकावरील हा रोग प्रामुख्याने रबी पिकावरील कांद्यावर तसेच खाण्याच्या व बियाण्याच्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कांदा पिकावर या करप्याचा प्रादुर्भाव Stemfilium या या बुरशीमुळे होतो. या रोगात सुरुवातीला पानावर पिवळसर ते तपकिरी चट्टे पडतात. नंतर हे चट्टे बुंध्या कडून शेंड्याकडे वाढत जाऊन पाने तपकिरी पडून सुकतात. या रोगात कांद्याची पात सुरकुतल्यासारखी आणि शेंडे जळाल्या सारखे दिसतात. फुलाच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होतात व त्या जागी वाकून मोडतात. पाऊस आल्यास किंवा ढगाळ वातावरण झाल्यास या रोगाचा प्रसार जोरात होतो.
कांदा पिकावरील करपा रोगासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना :
(१) कांदा पिकासाठी लागवड करताना रोपे नेहमी गादीवाफ्यावर तयार करावी तसेच गादीवाफ्यावर रोपासाठी बी टाकण्यापूर्वी शिफारशीत बीजप्रक्रिया करून घ्यावी.
(२) रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी आणि पिकांची फेरपालट करावी.
(३) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कांदा पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीने अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे तसेच नत्रयुक्त खताचा वापर संतुलित करावा व अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळावा तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पालाशयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
(४) कांदा पिकावरील फुल किडीचे व्यवस्थापन शास्त्रोक्त शिफारशीत पद्धतीने करावे
(४) कांदा पिकावर करपा रोगाची लक्षणे आढळून आल्यास योग्य निदान करून तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील पैकी कोणत्या एका बुरशीनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.
Difenoconazole 25% EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Kitazin 48% EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Tebuconazole 25.9% EC 12.5 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बुरशीनाशकाची कांदा पिकावरील करपा रोगाचे योग्य निदान करून गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीची शहनिशा करून फवारणी करावी गरज असल्यास पुन्हा एकदा बुरशीनाशक बदलून पंधरा दिवसांनी फवारणी करावी.
टीप : (१) रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी करण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच योग्य निर्देशीत प्रमाणात योग्य निदान करून बुरशीनाशकाचा वापर करावा.
(२) अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
(३) कांदा बिजोत्पादन संदर्भात मधमाशी सारख्या मित्र कीटकांना बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊनच रसायनाचा वापर करावा.
(४) रसायने फवारताना सुरक्षित कीडनाशक फवारणी तंत्राचा तसेच सुरक्षा किट वापर करावा आणि प्रत्यक्षात तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून संतुलित रित्या रसायने वापरणे हिताचे असते याची नोंद घ्यावी.
राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
source : hiteck Kisan