बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण असणार आहे. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील.
मंदौस म्हणजे तिजोरी हे नाव संयुक्त अरब राष्ट्राने दिलेले असून, ते ९ डिसेंबररोजी पाँडिचेरी व श्रीहरीकोटा येथील मामल्लापूरमजवळ मध्यरात्री जमिनीवर येणार आहे. याची तीव्रता शुक्रवार ते रविवार (९ ते ११ डिसेंबर) अशी राहील. महाराष्ट्रावर ११ ते १४ डिसेंबरपर्यंत परिणाम राहील. हे चक्रीवादळ गोलाकार फिरत येत असून, वेग ताशी ७६ किलोमीटर इतका आहे.
राज्यात ढगाळ वातावरण..
या चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असून, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ अपेक्षित आहे. १५ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहील. राज्यातील बहुतांश भागात ११ ते १४ डिसेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.