राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. आज (26 ऑक्टोबर) दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आला आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा महत्त्वाचा मानला जातो. याच शुभमुहूर्तावर सांगलीत हळद आणि गुळ सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या या शुभ मुहूर्तावर हळदीला 8 हजार रुपयांचा दर मिळाला तर गुळाला 4 हजार 200 रुपयांचा दर मिळाला आहे.
सौद्याच्या प्रारंभीच हळदीला आठ हजार रुपयांचा दर
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गूळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डमध्ये हळदीच्या पोत्यांचं यावेली पूजन करुन या वर्षीच्या हळद सौद्यास मोठ्या उत्साहात प्रारंभकरण्यात आला. सौद्याच्या प्रारंभीच हळदीला आठ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. तर मार्केटमध्ये गुळाला 4 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी 3 हजार 600 ते 3 हजार 800 रुपये दर आहे. आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरमध्ये देखील गुळाच्या सौद्याचा प्रारंभ
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूरमध्ये देखील गुळाच्या सौद्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीतील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. नारळ फोडून सौद्यांना प्रारंभ झाला. त्यानंतर गुळाला बोली लावण्यात आली. याकडे सर्व गुळ उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं असतं. कारण आज जो गुळाला दर मिळतो तोच दर कायम राहावा अशी अपेक्षा गुळ उत्पादक शेतकऱ्यांची असते.
नैसर्गिक संकटाला तोड देत शेतकऱ्यांनी घेतलं हळद आणि गुळाचं उत्पादन
दरम्यान, यावर्षी परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. त्यांची उभी पिकं पाण्यात आहेत. काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु होती, तर काही ठिकाणी पिकांची काढणी पूर्ण झाली होती. अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावू घेतला आहे. या नैसर्गिक संकटाला तोड देत शेतकऱ्यांनी हळद आणि गुळाचं उत्पादन घेतलं आहे. एवढ्या संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलं आहे. त्यामुळं चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.