सध्या वातावरणातील तापमान कमी होत आहे. अशा थंड हवामानात तेलकट डाग आणि इतर रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही. याच परिस्थितीचा फायदा घेऊन सध्याच्या कालावधीत सामूहिक पद्धतीने डाळिंब बागायतदारांनी बागेत स्वच्छता मोहीम राबवून रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.
चालू हंगामात बऱ्याच डाळिंब बागांना भेटी दिल्यावर असे लक्षात आले आहे, की आंबेबहर संपलेल्या बऱ्याच बागा विश्रांतीच्या अवस्थेत तशाच सोडलेल्या आहेत. या बागांमध्ये तेलकट डाग रोग आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी- जास्त प्रमाणात आढळून येतो. या काळात बागेची फारशी काळजी शेतकरी घेत नसल्याचे दिसून येते.
बागेमध्ये रोगट फळे, पाने व इतर अवशेष पडलेले आहेत. झाडांच्या खाली तेलकट डाग रोगाच्या पानांचा सडा पडल्यासारखा दिसतो. बागेमध्ये तणेसुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहेत. यामुळे आर्द्रता वाढण्यास काहीशी मदत होते. डाळिंबाचा येणारा हंगाम यशस्वी होण्यासाठी सध्या बागेच्या विश्रांतीच्या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच जी बाग फळांवर आहे त्या बागेमध्येसुद्धा रोग नियंत्रणाच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात.
हिवाळ्यातील व्यवस्थापन
सध्या हिवाळा सुरू झालेला आहे, वातावरणातील तापमान कमी होत आहे. अशा थंड हवामानात तेलकट डाग आणि इतर रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही, कारण थंड हवामानात जिवाणू आणि बुरशींची वाढ कमी प्रमाणात होते. नेमका याच परिस्थितीचा फायदा आपल्याला घ्यावयाचा आहे. येथून पुढे तापमान कमी होणार आहे, त्यामुळे सध्याच्या कालावधीत बागेत स्वच्छता मोहीम राबवून रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.
डाळिंब पिकाच्या तिन्ही हंगामांत तेलकट डाग व इतर बुरशीजन्य रोगांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले, की या रोगांचा प्रादुर्भाव मृग बहराच्या वेळी (जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये) जास्त असतो, त्या खालोखाल आंबे बहरात (मार्च ते मे महिन्यापर्यंत) असतो. तेलकट डाग व इतर रोगांचा सर्वांत कमी प्रादुर्भाव हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत म्हणजेच हस्त बहरात दिसून येतो. थंड हवामानात तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंची संख्या त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढत नाही. या उलट जिवाणूंची संख्या दमट व उष्ण हवामानात व पावसाळी हवामानात खूप मोठ्या प्रमाणात वाढते.
कीड व रोग नियंत्रणासाठी हिवाळ्यात करावयाची महत्त्वाची कामे
1) डाळिंबावरील मावा व फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा कीड दिसल्यास 15 मि.लि. डायमेथोएट (30 टक्के ई.सी.) किंवा 15 मि.लि. डायक्लोरव्हॉस किंवा तीन मि.लि. इमिडाक्लोप्रीड (17.5 ई.सी.) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा कीड दिसल्यास दोन मि.लि. स्पिनोसॅड (45 एस.सी.) किंवा दहा मि.लि. स्पिनोसॅड (2.5 टक्के) किंवा अझाडिरॅक्टीन (निंबोळीवर आधारित कीटकनाशक) तीन मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2) डाळिंबावरील तेलकट डाग व इतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करावयाची उपाय योजना
थंड हवामानात तेलकट डाग व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बागेतील तेलकट डाग व अन्य बुरशीजन्य रोगांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
डाळिंबाची बाग व शेताचे बांध तणमुक्त ठेवावेत.
बागेत रोग येऊ नये म्हणून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.
3) डाळिंबाची नुकतीच लागवड झालेल्या बागेत करावयाची उपाय योजना
थंड हवामानात डाळिंबाचे झाड सुप्त अवस्थेत जाते किंवा झाडाची वाढ मंदावते. अशा परिस्थितीत बागेतील तापमान वाढविण्यासाठी झाडांना पाटाने पाणी द्यावे किंवा बागेच्या कडेला शेकोटी पेटवून धूर करावा.
बागेत नियंत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवावी, म्हणजे बाग तणमुक्त व कीड व रोगांच्या अवशेषांपासून मुक्त ठेवावी.
4) फळावर असलेल्या डाळिंब बागेत करावयाची उपाय योजना
बागेत स्वच्छता मोहीम राबवावी.
बागेतील व बागेभोवती पिकाचे रोगट अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
हिवाळ्यात डाळिंबाची फळे तडकण्याचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बागेतील तापमान वाढविण्यासाठी बागेच्या कडेला शेकोटी पेटवून धूर करावा.
बागेला पाणी नियमित द्यावे, पाण्याचे प्रमाण सारखेच ठेवावे.
5) बहर धरलेल्या डाळिंब बागेत करावयाची उपाय योजना
नवीन काडीवर रसशोषण करणाऱ्या मावा व फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी उपाय योजना कराव्यात.
हिवाळ्यात फुलकळी निघण्यास वेळ लागतो किंवा फुलकळींचे प्रमाण कमी असते. अशा परिस्थितीत फुलकळी निघण्यापूर्वी बागेतील तापमान वाढविण्यासाठी मोकळे पाणी द्यावे.
बागेत स्वच्छता मोहीम राबवावी. पिकाचे रोगट अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
महत्त्वाच्या उपाय योजना
गावपातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबवावी.
वरचेवर बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.
शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करून बागेतील रोग नियंत्रणात ठेवावे.
बागेतील रोगट अवशेष नष्ट केल्यानंतर बागेत झाडावर बोर्डो मिश्रणाची (0.4 ते 1.0 टक्के तीव्रतेची) फवारणी करावी. किंवा झाडावर 2 ब्रोमो, 2 प्रोपेन, 1, 3 डायोलची (250 ते 500 पीपीएम तीव्रतेची) फवारणी करावी. या फवारणीनंतर आठ- दहा दिवसांच्या अंतराने 25 ग्रॅम कॅप्टन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
झाडावरील फवारणी झाल्यानंतर लगेच जमिनीवर चार टक्के कॉपर डस्टची धुरळणी करावी (25 किलो/ हे.) किंवा ब्लिचिंग पावडरचे द्रावण आळ्यामध्ये ओतावे (150 ग्रॅम ब्लिचिंग पावडर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी प्रत्येक झाडाच्या आळ्यात करावी.