..सुनक केवळ भिन्नवर्णीय नाहीत. तर भिन्नधर्मीयदेखील आहेत. प्रॉटेस्टंट ख्रिश्चन बहुसंख्येने असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी सुनक यांच्या रूपाने प्रथमच हिंदूधर्मीय विराजमान होईल. हे शुद्ध त्या देशाचे मोठेपण. संपूर्ण निवडणुकीच्या काळात सुनक यांच्या वर्णाचा ना उल्लेख झाला ना धर्माचा. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह लावल्यामुळे तिला पाकिस्तानी, पाक-धार्जिणी ठरवणाऱ्या; पण राजीव गांधी यांच्याशी विवाहानंतर सोनिया गांधी यांस मात्र इटालियन म्हणूनच हिणवणाऱ्या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश जनतेच्या मानसिक मोठेपणाचा आकार लक्षात यावा. ज्या देशावर ब्रिटिशांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केले त्या देशातील स्थलांतरित आणि आश्रिताचा मुलगा थेट पंतप्रधानपदी बसणार याचा कोणताही विषाद त्या देशातील मतदारांनी व्यक्त केला नाही. देश, प्रदेश मोठे का होतात, याचे उत्तर या मानसिकतेत आहे. आता अलीकडच्या आपल्या सांस्कृतिक गळेपडू परंपरेनुसार हा गृहस्थ कसा ‘आपल्यापैकीच’ आहे हे सांगण्यात धन्यता मानली जाईल. याआधीही ‘लोकसत्ता’ने दाखवून दिल्यानुसार असे करणे केवळ बालिश आणि हास्यास्पद म्हणावे लागेल.
शतकभरापूर्वी अनेक सिंधी-पंजाबी वा गुजराती-मारवाडी कुटुंबे व्यवसायसंधीच्या शोधात आफ्रिकेत गेली. तेथे त्यांचा उत्तम जम बसला. तथापि १९६० आणि नंतरच्या दशकभरात आफ्रिकेतील अनेक देशांतील चिघळलेल्या परिस्थितीमुळे अथवा त्या- त्या देशांतून हाकलून दिल्यामुळे या भारतीयांस परागंदा व्हावे लागले. खरे तर तोपर्यंत ब्रिटिशांचे जोखड दूर होऊन भारत स्वतंत्र झालेला होता. तरीही या गुजराती, मारवाडी, पंजाबी आदींनी भारतात येण्याचे टाळले आणि भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनमध्ये आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. उदारमतवादी ब्रिटननेही त्यांना आपले म्हटले. सुनक कुटुंबीय अशांतील एक. लंडनच्या साऊथ हॉल, वेम्ब्ले आदी उपनगरांत या असंख्य स्थलांतरितांनी छोटे-मोठे उद्योग करून उदरनिर्वाह केला. या परिसरांत आजही गौरेतर बहुसंख्येने दिसून येतात. अशाच कुटुंबात वाढलेल्या ऋषी सुनक यांनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बाजी मारली. आता त्या देशाचे सर्वोच्च सत्तापदही त्यांस मिळेल. हे सारे बरेच काही शिकवून जाणारे आहे. उदारमतवाद हा केवळ ‘वसुधैव कुटुंबकम्’ यासारख्या वचनांपुरताच मर्यादित न राहता आचरणातही येऊ लागल्यास काय होते हे ब्रिटनमध्ये सुनक, अमेरिकेत उपाध्यक्ष कमला हॅरिस आदींच्या उदाहरणांवरून समजून घेता येईल. आताही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुनक यांच्या पंतप्रधानपदी निवडले जाण्यास अनेक भारतीय संदर्भ जोडले जातील. काही सांस्कृतिक महाजन ‘‘ब्रिटिशांची आपण कशी जिरवली’’, ‘‘काव्यात्म न्याय’’ इत्यादी वचनांद्वारे आपला ‘मोठेपणा’ मिरवण्याचा प्रयत्न करतील.तसे झाल्यास करणाऱ्यांचे लघुरूप तेवढे त्यातून दिसेल..
लोकसत्ता अग्रलेखातून