पुरोगामी महाराष्ट्रात गेले काही दिवस चालू असलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सर्व सामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. राजकीय पक्षांवरचा आणि नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे. स्वार्थी राजकीय डावपेच आणि कोलांटीउड्या पाहून जनता चक्राऊन गेली आहे. अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी व्यक्त केली आहे.
सर्व सामान्य जनता जरी याबाबत चर्चा करत असली तरीही सत्ताबदल अथवा राजकीय घडामोडींशी शेतकर्यांना काहीही देणंघेणं नसल्याची नाराजी आणि खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतीविरोधी धोरणांवर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी कधी बंड केले आहे का…?.उद्या कोणाचेही सरकार आले तरी शेतकर्यांचे प्रश्न वावरातच अडकून पडणार आहेत हे कटू सत्य शेतकर्यांना पक्के माहित आहे.
कोरोना काळात देशाचा GDP मायनस मध्ये गेला असताना भारतीय अर्थ व्यवस्थेला फक्त कृषी क्षेत्राने तारले होते याचाही विसर राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांना पडला आहे. कृषी मालाचे आयात- निर्यात धोरणांविषयी धरसोड वृत्ती. आधारभावाचे फक्त दाखवलेले गाजर. शेतीमाल उत्पादन खर्चात झालेली प्रचंड प्रमाणात वाढ, परंतु योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्यांची होत असलेली आर्थिक कोंडी यावर कोणीही बोलायला तयार नाही.
आज कृषी प्रधान देशात शेतकरी विविध समस्यांनी घेरला गेला आहे. परंतु याचे केंद्राला किंवा राज्य सरकारला काहीही सोयर सुतक नाही. शेतकर्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्राळविक्राळ समस्यांनी शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे.
त्यामुळे सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींशी शेतकर्यांना काहीही देणंघेणं नसून एक युजलेस प्रकार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. कांद्याचे बाजारभाव कोसळलेले असताना बिळात लपून बसलेले उंदीर आता राजकीय ब्रेकिंग न्युज दाखवण्यासाठी उड्या मारत बाहेर पडले आहेत.