टोमॅटो, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या सोडण्याची नामुष्की आली आहे. अवसरी बु. (ता. आंबेगाव) येथील प्रशांत वाडेकर या शेतकर्याने एक एकर कोबी व एक एकर टोमॅटो पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून पीक सपाट केले आहे.
या परिस्थितीकडे सरकार लक्ष देणार काय, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहेत. बाजारभाव मिळेल या आशेने कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी अशी तरकारी पिके मोठ्या प्रमाणावर लागवड केली, मात्र बाजारभाव पडल्यामुळे शेतकर्यांना भाजीपाल्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, तोडणी व वाहतूक खर्च शेतकर्याच्या अंगावर येत आहे. बहुतेक शेतकर्यांनी आपल्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतकर्यांनी उभ्या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे.