यंदा सर्वदूर पाऊस न झाल्याने सोयाबीन लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे सांगितले जाते; मात्र शुक्रवारपर्यंत (ता. १५) सोयाबीनची पेरणी शक्य असल्याने गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही क्षेत्राच्या बाबतीत सरासरी गाठली जाणार आहे. त्यामुळे काही दिवसांत पावसाचा जोर) वाढण्यासोबतच पेरणीच्या कामालाही गती येणार आहे. परंतु गेल्या वर्षीच्या कॅरी फॉरवर्ड स्टॉक तसेच यंदाच्या हंगामातील नवे सोयाबीन बाजारात येण्याची स्थिती बघता बाजारात सोयाबीन दरात घसरण अनुभवली जात आहे. तसेच नव्या सोयाबीनची आवक होईपर्यंत दर ५६००- ५७०० रुपयांपासून ६५००-६६०० रुपये राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरात प्रतिक्विंटल १८०० रुपये घसरण : एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली मंदी, शिल्लक साठा यामुळे सोयाबीन दरात १८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदविली गेली आहे. नव्या सोयाबीनची आवक झाल्यानंतर देखील हा दबाव कायम राहण्याची भीती आहे. नव्या सोयाबीनची आवक होईपर्यंत दर ५६००- ५७०० रुपयांपासून ६५००-६६०० रुपये राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्यःस्थितीत संपूर्ण भारतात सोयाबीनची आवक १ लाख २५ हजार पोत्यांची आहे. १५ जुलैनंतर लागवडीचा अंदाज येईल. त्यानंतर शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढतील अशा स्थितीत सोयाबीनची देशभरातील आवक चार लाख पोत्यांपर्यंत पोहोचेल, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
देशात सोयाबीनखालील क्षेत्र एक लाख १९ हजार ९८२ हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक ५५ हजार ६८७ हेक्टर लागवड मध्य प्रदेशात होते. त्यामुळेच मध्य प्रदेशला सोयाबीनचे हब अशी ओळख आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून या भागात गेल्या वर्षीच्या हंगामात ४३ हजार ४८४ हेक्टरवर लागवड होती. राजस्थान ९ हजार ५२३, छत्तीसगड ५१३ हेक्टर, गुजरात २ हजार २३७, कर्नाटक ३ हजार ८२७, तेलंगणा ३,४८८ हेक्टर याप्रमाणे लागवड क्षेत्र आहे.
देशात यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच लागवड क्षेत्र राहण्याचा किंवा कापूस लागवड वाढल्यास काही प्रमाणात सोयाबीन लागवड कमी होण्याचा अंदाज आहे.मध्य भारत तसेच महाराष्ट्राच्या ज्या भागांत १५ दिवसांपूर्वी लागवड झाली. त्या भागांतील पीक परिस्थिती कुठे समाधानकारक तर काही ठिकाणी पावसाने खंड दिल्याने दुबार पेरणी करण्यापर्यंत पोहोचली आहे. यावर्षी सोयाबीनचा मागील शिल्लक साठा (कॅरी फॉरवर्ड स्टॉक) २० लाख टनांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच शेतकऱ्यांकडेदेखील सोयाबीन असल्याचे सांगत दर पाडण्यात आले आहेत. त्यामागे कारण देताना व्यापारी सांगतात की गेल्या वर्षी २१ लाख टन सोयाबीनची निर्यात झाली होती. यंदा ती अवघी सहा लाख टन इतकी अत्यल्प आहे. शेतकऱ्यांनी देखील दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीनचा साठा करून ठेवला. त्याचाही परिणाम दरातील घसरणीवर झाला आहे.
source : agrowon