मार्केट यार्ड येथील धान्य बाजार (भुसार) प्रवेशद्वार क्रमांक दोन जवळील गणराज मार्केट इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावरील प्रोफेशनल कुरियर कंपनीच्या कार्यालयात आज सकाळी साडेअकरा वाजता पाच हल्लेखोर घुसले त्यातील एकाने धारदार शस्त्राने काच फोडली. काच फोडत असताना दुसऱ्याने हातात असलेल्या पिस्टलने एक राऊंड फायर केला. हल्लेखोरांपैकी एकाने आत प्रवेश केला. यादरम्यान मिळेल तेवढी रोकड रक्कम आणि दोन मोबाईल घेऊन हल्लेखोर पसार झाले. लुटलेली रक्कम एकूण अंदाजे 28 लाख रुपयेपर्यंत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हल्लेखोरांपैकी एकाला काच लागल्याने कार्यालयात रक्त बरेचसे सांडले होते. शिवनेरी रोडने पुढे सातारा रस्त्याने हल्लेखोर गेल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. फिर्यादी राजेश जयंतीलाल पोपट (वय 46) यांनी तक्रार दिली आहे. घटनास्थळी नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग , सहाय्यक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे , मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.