पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. बाजारात काही जिवाणू तसेच विषाणूजन्य आजाराविरुद्ध लसी उपलब्ध आहेत.
त्यामुळे पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे (उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी). पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक असते. त्यामुळे जनावरांना शिफारशीत कृमीनाशके द्यावीत. पावसाळा संपल्यावर सुद्धा वर्षभर शिफारशीनुसार नियमित कृमीनाशके द्यावीत.
संसर्गजन्य आजार
फऱ्या :
– घावरे, घाट्या, एकटांग्या नावाने ओळखला जातो. दोन ते तीन वर्षांतील जनावरांना होतो.
– पाणथळ, दलदलीच्या जमिनीत आजाराचे जिवाणू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना याचा प्रादुर्भाव होतो.
प्रसार:
– जिवाणूंनी दूषित झालेला चारा, पाणी यांमार्फत तसेच जनावरांच्या तोंड तसेच अंगावरील जखमांतून जिवाणू प्रवेश करतात.
– शरीरातील मांसल भागात जिवाणू काही काळ सुप्तावस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळताच त्यांची वाढ झपाट्याने होऊन जनावरे आजारी पडतात.
लक्षणे :
– खूप ताप येतो, मांसल भागात विशेषतः फऱ्या वर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते.
– सूज दाबल्यावर करकर आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवंडते, शरीर क्रिया मंद होतात.
उपचार :
– पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार महत्त्वाचे ठरतात.
घटसर्प :
– आजार गळसुजी, परपड या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये तीव्र स्वरूपात आढळतो.
प्रसार :
– आजारी जनावराचे नाक, तोंडातून वाहणारा स्राव, मलमूत्र, दूषित चाऱ्यातून प्रसार वाढतो.
लक्षणे :
– खूप ताप येतो, घशास सूज येणे, जलद श्वासोच्छ्वास, डोळे लाल होणे, जीभ बाहेर येते.
– नाकातून शेंबडासारखा स्राव व तोंडातून लाळ वाहते. काही वेळेस रक्ताची हगवण होते. अंगावर सूज दिसून येते.
उपचार
– तातडीने पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
अँथ्रेक्स :
– गाईमध्ये याचा सर्वांत जास्त प्रसार दिसतो. हा जिवाणूजन्य आजार आहे.
प्रसार :
– ज्या वेळी जनावरे चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात, त्या वेळी हे जिवाणू श्वासोच्छ्वावासाद्वारे शरीरात प्रवेश करतात.
लक्षणे :
– जनावर सर्वसामान्य दिसत असताना २ ते ३ तासांत मृत पावते.
– उच्च तापमान, घाबरल्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापते.
– श्वासोच्छ्वासात अडथळा येतो. धाप लागते, जनावर जमिनीवर पडते.
उपचार
– तातडीने पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
लाळ्या खुरकूत
– आजारी जनावराचे तोंड, सड, खुरांमधून स्राव येत राहतो. खूर खरबरीत झाल्यासारखे दिसतात.
प्रसार :
– प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पाणी, शेण, चारा इत्यादीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो. जनावरांचे संगोपन करणाऱ्या व्यक्ती, जनावरांच्या माध्यमातून प्रसार होतो.
लक्षणे :
– उच्च ताप (१०४- १०५ अंश फॅरेनाहाइट) येतो. तोंडाद्वारे तंतुमय लाळ सतत येत राहते.
– शरीरात थकवा जाणवून अशक्तपणा येतो.
– संकरित गाई आजारास अत्यंत संवेदनशील आहेत.
उपचार
– लक्षणे दिसताच तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
– आजारी जनावरांचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे.
गर्भपात (ब्रुसल्लोसिस) :
– गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्यांमध्ये आजार दिसतो. वयात आलेल्या जनावरांत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो.
लक्षणे :
– गाभण गाई, म्हशींमध्ये गर्भ सहा महिन्यांचा असताना किंवा नंतर गर्भपात होतो.
– योनी वाटे पिवळसर किंवा तपकिरी किंवा चॅाकलेटी रंगाचा स्राव वाहतो.
– जनावर गाभडल्यावर त्याचा झार किंवा वार लवकर पडत नाही.
उपचार :
– गर्भपात झालेल्या जनावरास वेगळे बांधावे. तातडीने पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
– वेळापत्रकानुसार लसीकरण करावे.
लसीकरणाचा तक्ता:
आजार —- लसीकरणाची वेळ
१) लाळ्या खुरकूत – पहिली मात्रा ३-४ महिने वयात, दुसरी मात्रा ६-८ वयात, नंतर वर्षातून दोनदा (सप्टेंबर, मार्च)
२) घटसर्प —- पहिला मात्रा सहा महिने वयात, वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी, प्रादुर्भावीत भागामध्ये वर्षातून दोनदा.
३) फऱ्या — पहिला मात्रा सहा महिने वयात, वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी.
४) फाशी —- वर्षातून एकदा मे महिन्यात, प्रादुर्भाव असलेल्या भागामध्येच पावसाळ्यापूर्वी.
५) गर्भपात — मादी वासरात ४-५ महिने वय असताना फक्त एकदा. (प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये)
लसीकरणासाठी घ्यावयाची काळजी :
१. लसीकरणाच्या १ ते २ आठवड्यांपूर्वी जनावरांना जंतनाशक पाजावे. बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करावे.
२. लसीकरण निरोगी जनावराला करावे. तणावग्रस्त असलेल्या जनावरांत लसीकरण टाळावे (ताप असल्यास, गाभण असल्यास, रोगाचा प्रादुर्भाव असल्यास)
३. लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
४. एकाच दिवशी कळपातील सर्व जनावरांना लस टोचावी.
५. लसीकरणाच्या सर्व नोंदी लिहून ठेवाव्यात.