देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली. सध्या नव्या मालामध्ये ओलावा अधिक आहे. मात्र बाजारात दाखल झालेल्या तुरीची लगेच उचल केली जात असल्याने दर टिकून आहे. सध्या देशातील बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा अधिक आहेत.
देशातील तूर काढणीला आल्यानंतर दर काहीसे नरमले होते. मात्र खालच्या पातळीवर तुरीला चांगला उठाव मिळत आहे. डाळीला मागणी असल्याने प्रक्रिया प्लांट्सची खरेदीही वाढत आहे. त्यामुळे तुरीच्या दराला आधार मिळत आहे. सध्या तुरीची आयात वाढत आहे. मात्र आयात झालेली तूर हातोहात विकली जात असल्याने त्याचा फारसा दबाव दरावर झाला नाही.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक होत आहे. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. तसेच काही ठिकाणी पिकाची गुणवत्ताही कमी दिसून आली. महाराष्ट्रात बाजारात येत असलेल्या तुरीमध्ये १५ ते १७ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. तर कर्नाटकातही ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या बाजारातील आवक कमी असली तरी पुढील काही दिवसांमध्ये आवक वाढण्याचा अंदाज आहे.
नव्या तुरीला सध्या प्रति क्विंटल ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा जास्त आहे. यंदा केंद्र सरकारने तुरीसाठी प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला.
उत्पादन घटणार?
यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी राहणार आहे. तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पिकाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मोठा फटका बसला. तर आता काही भागांमध्ये तुरीवर कीड-रोग पडल्याच्या बातम्या येत आहेत. या कारणांमुळे यंदा देशातील तूर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान २० ते २५ टक्के कमी राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत.
काय दर मिळू शकतो?
आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची साधारणपणे १० लाख टनांपर्यंत उपलब्धता असू शकते. पण ही सर्व तूर देशात आयात झाली तरी पुरवठा मागणीऐवढा होणार नाही, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे यंदा देशात तुरीचा पुरवठा मर्यादीत राहील. परिणामी तुरीला यंदा ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.