औरंगाबाद – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसात परतीच्या पावासमुळे मराठवाड्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची ठाकरे यांनी पाहणी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. शेतकरी बांधव ठाकरेंना म्हणाले की, “साहेब.. बँकेचा तगादा आहे. पण, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही हवालदिल झालो आहोत, काहीतरी करा साहेब.मदत करा, कर्ज माफ करा, आम्हाला आत्महत्या करायला लावू नका, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
यावर ठाकरे म्हणाले की, “बांधवांनो धीर सोडू नका. आपलं सरकार असताना मदत पोहचत होती. मात्र आताच्या सरकारलाही मदत पोहचवायला भाग पाडू. तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला.”
नुकसानीच्या पाहणीनंतर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “खऱ्या अर्थाने कोरोनाच्या संकटकाळात शेतीने आणि शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था सांभाळली. आताचं सरकार हे ‘उत्सवी’ सरकार आहे, मात्र अतिवृष्टीच्या संकटात शेततकऱ्यांचं दिवाळं निघालंय. शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० रूपये मदत मिळाली पाहिजे. ही शेतकऱ्यांची मागणी, आणि या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे.”
दरम्यान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहचवा. नाहीतर शेतकरी बरबाद होईल. सरकारने जाहीर केलेला शिधाही लोकांपर्यंत पोहचत नाही. मात्र शिधासुद्धा शेतकऱ्यांकडूनच येतो एवढं लक्षात ठेवा.अशा संकटाच्या काळात आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना उघड्यावर पाडू नका. पाझर फुटत नसेल तर सरकारला घाम फोडा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले