काही वेळा निरोगी गाभण जनावरामध्ये (Pregnent Animals) अचानक गर्भपात (Abortion) झाल्याचे दिसून येते. गर्भपाताची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis) या आजारामुळे गाभण जनावरांमध्ये चौथ्या महिन्याच्या पुढील आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते.
लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणुजन्य आजार असून १५० हून अधिक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये हा रोग दिसून येतो.
जास्त दुध देणाऱ्या जनावरांमध्ये लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी, चारा यावर आजारी जनावरांचे मूत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडल्याने होत असतो.
बाधित जनावरांचे मूत्र हे प्रसारास प्रमुख कारणीभूत घटक असते. एखाद्या जनावराला या रोगाची बाधा झाल्यास आजारपणानंतर जवळपास ४० दिवस या रोगाचे जंतू मुत्रावाटे बाहेर पडत असतात.
हा आजार सर्व पाळीव प्राणी, तसेच जनावरांपासून माणसांमध्येही याचा संसर्ग होत असतो. अति पावसाच्या, पाणथळ भागात जेथे पाणी साठून राहते तसेच ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
या आजाराचे जीवाणू उंदारच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने या आजाराचा प्रसार होत असतो. Animal Diseases
आजाराची लक्षणे काय आहेत ?
या आजाराचा प्रादुर्भाव तत्काळ तीव्र, तत्काळ सौम्य आणि दिर्घकालीन तीव्र या तीन टप्प्यात दिसून येतो. एक महिन्यापर्यतची वासरे या रोगाला पटकन बळी पडतात.
गाभण जनावरांमध्ये चौथ्या महिन्याच्या पुढील आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते.
कोणतीही लक्षणे नसताना अचानकपणे जनावरांचा गर्भपात होणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. आजाराचे निदानजनावरांच्या लघवीमधील रोगजंतूचा प्रादुर्भाव तपासून करता येते.
प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ?
घूस, उंदीर यांची संख्या कमी करण्यासाठी गोठ्यात तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत. लक्षणानुसार प्रभावी प्रतिजैविके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत.